buldhana village news

चोरपांग्रा (Chorpangra) गावासाठी शासनाने यापूर्वीच तब्बल २३ लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना पूर्ण केली आहे. (Water Shortage News) त्यामध्ये विहीर, पाईपलाईन, नळ, पाण्याची टाकी यासह सर्व सुविधा दिल्या आहेत. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.

    बुलढाणा : सिंदखेडराजा (Sindkhedraja) तालुक्यातील चोरपांग्रा (Chorpangra) गावात सध्या भर पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई (Water Shortage) निर्माण झाली आहे. गावाला सतरा दिवसानंतर पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे.  पाणी मिळाले नाही तर ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा गावातील महिलांनी दिला आहे.

    चोरपांग्रा गावासाठी शासनाने यापूर्वीच तब्बल २३ लाख रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना पूर्ण केली आहे. त्यामध्ये विहीर, पाईपलाईन, नळ, पाण्याची टाकी यासह सर्व सुविधा दिल्या आहेत. मात्र स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली. गावाला पंधरा ते वीस दिवस नळाद्वारे पाणी पुरवठा होत नाही.

    सध्या नागरिकांना गावाबाहेर जाऊन विहिरीतून पाणी काढून आणावे लागत आहे. यामुळे शेतीची कामे अडली आहेत. मजुरांना शेतात कामाला जाता येत नाही. शाळकरी मुलांना शाळा सोडून पाणी भरण्यासाठी मेहनत करावी लागते. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडेसुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.