खांदा वसाहतीमधील पाणी पुरवठा होणार सुरळीत, अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या प्रयत्नांना यश

सात रहिवाशी संस्थामधील नागरिकांना मागील काही दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पाण पुरवठ्याला सामोरे जावे लागत होते.

    खांदा वसाहतीमधिल सेक्टर 9 परिसरातील नागरिकांना काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या या समस्येवर उपाय निघावा या हेतूने परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर उतारा म्हणून ज्यादा व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा निर्णय सिडको तर्फे घेण्यात आला असल्याची माहिती सिडको अधिकाऱ्यांनी दिली आहे. खांदा वसाहतीमधील सेक्टर 9 परिसरात असलेल्या हरिदर्शन, उमया कृपा, गुरुस्मृती, वरद विनायक, गणेश अपार्टमेंट, श्री श्रध्दा आणि स्वागत या सात रहिवाशी संस्थामधील नागरिकांना मागील काही दिवसांपासून कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पाण पुरवठ्याला सामोरे जावे लागत होते.

    याबाबत सदर रहिवाशी संस्थामधील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते तथा परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्याशी सपंर्क साधला. सामाजिक कार्यकर्ते वाघमारे यांनी याबाबत सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता नागरिकांना होणाऱ्या गैरसोईची माहिती देत नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली. वाघमारे यांच्या मागणीची दखल घेत शुक्रवारी (ता.16) सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करणाऱ्या रहिवाशी संस्थामधील नागरिकांची भेट घेऊन काही दिवसांतच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच ज्यादा व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन रहिवाशांना दिले आहे.

    सेक्टर-9 मधील सोसायटीच्या रहिवाशांनी परिवर्तन संस्थेकडे पाण्याच्या समस्येबाबत तक्रार केल्यावर सिडकोचे पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता मूळ साहेब यांची भेट घेतली. त्यांनी नवीन पाईप लाईन बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही तात्पुरती समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी आकाश म्हेत्रे यांना खांदा कॉलनीतील सोसायट्यांना भेट देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार म्हेत्रे यांनी शुक्रवारी सोसायट्यांना भेट देऊन पाण्याच्या मीटर मधील अडकलेला कचरा काढून पाणी पुरवठा सुरळीत करून दिला आहे.