आरक्षणावर मुख्यमंत्री शिंदे यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘आरक्षणासाठी आमचं सरकार प्रामाणिकपणे काम करतंय, पण…’

महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही. आम्ही कोणालाही फसवणार नाही आणि फसवू इच्छित नाही. पण ती मागणी कायदेशीर असली पाहिजे. नियमात बसली पाहिजे.

    मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. हा आरक्षणाचा प्रश्न चिघळण्याची (Maratha Reservation) चिन्हे निर्माण झाली आहेत. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा आरक्षणासाठी आमचं सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे. पण आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहोत, असे त्यांनी म्हटलं आहे.

    मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘यापूर्वी मराठा समाजाने काढलेल्या मोर्चामुळे राज्यातील शांतता, कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली नव्हती. पण आता काही लोक आज कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या मोर्चाला गालबोट लागत आहे. आम्ही मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार आहोत. त्याचे फायदे कायमस्वरूपी असले पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. आरक्षणासाठी आमचं सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे’.

    आम्ही कोणाला फसवणार नाही

    महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही. आम्ही कोणालाही फसवणार नाही आणि फसवू इच्छित नाही. पण ती मागणी कायदेशीर असली पाहिजे. नियमात बसली पाहिजे. आमच्या सरकारने समाजाला एकप्रकारे फसवलं, अशी भावना जनतेत जाऊ देणार नाही, त्यामुळे टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत.

    टोकाचं पाऊल उचलू नका…

    राज्यातील अनेक मराठा बांधवांनी आत्तापर्यंत आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा बांधवांनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलू नये. आपल्या मुला-बाळांचं, कुटुंबाचं विचार करावा. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात उद्या काही प्रतिनिधींशी चर्चा उपसमिती आणि अधिकारी करतील, असेही त्यांनी सांगितले.

    सरकारला जरांगे यांची चिंता

    मनोज जरांगे यांच्या उपोषणावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले पाहिजे. पाणी घेतले पाहिजे. अखेर सरकारला त्यांची चिंता आहे. मराठा समाजाचा लढा सरकारने गांभीर्याने घेतला आहे. आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.