‘आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही, लोकसभा निवडणुकीसाठी ‘वंचित’चे 42 उमेदवार तयार’; प्रकाश आंबेडकर यांचं विधान

आम्ही आजही महाविकास आघाडीचे घटक नाही. आम्हाला फक्त चर्चेसाठी बोलावले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वंचितचे 42 उमेदवार तयार आहेत. आताच आम्ही नावे जाहीर करणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) म्हणाले.

    मुंबई : आम्ही आजही महाविकास आघाडीचे घटक नाही. आम्हाला फक्त चर्चेसाठी बोलावले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वंचितचे 42 उमेदवार तयार आहेत. आताच आम्ही नावे जाहीर करणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) म्हणाले. भाजप आम्हाला तर लोकसभेच्या 120 जागा द्यायला तयार आहे, असे मिश्किल विधान त्यांनी एका प्रश्नावर बोलताना केले. तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपमध्ये जावे, असा सल्लाही दिला.

    मराठा समाजाचे नेते झोपले होते. या सर्व नेत्यांना बाजूला ढकलून एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे हिरो ठरले आहेत. त्यांच्याबद्दल मराठा समाजात सहानुभूती वाढली आहे. आता एकनाथ शिंदेच स्ट्राँग मराठा लीडर झाले असून सगळ्यांना त्यांनी क्लिन बोल्ड केले आहे, असे सांगतानाच एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

    आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी शिंदे यांचे कौतुक केल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. तर, आंबेडकर यांच्या या विधानाने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केले. मराठा समाजातील नेते झोपले आहेत. मराठा समाजातील जनतेला मराठा नेत्यांबद्दल चिड तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती दिसते आहे. मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात ज्या मागण्या केल्या त्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आले आहेत.