आम्ही खोक्यांच्या चौकशीला तयार, आरोप सिद्ध करून दाखवाच; SIT चौकशीवर भूमरे काय म्हणाले?

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारमधील आमदारांची 50 खोक्यांबाबत एसआयटी चौकशी करा, अशी मागणी केली आहे. शिंदे गटाचे नेते संदीपान भूमरे यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांना आम्हाला बदनाम करण्याशिवाय दुसरं काम नाही. खोके घेतल्याचे आरोप करतात. आम्हीही तयार आहोत. एकदा त्यांनी सिद्धच करून दाखवावं, असे आव्हान भुमरे यांनी दिले आहे.

    औरंगाबाद : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारमधील आमदारांची 50 खोक्यांबाबत एसआयटी चौकशी करा, अशी मागणी केली आहे. शिंदे गटाचे नेते संदीपान भूमरे यांनी त्यावर प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांना आम्हाला बदनाम करण्याशिवाय दुसरं काम नाही. खोके घेतल्याचे आरोप करतात. आम्हीही तयार आहोत. एकदा त्यांनी सिद्धच करून दाखवावं, असे आव्हान भुमरे यांनी दिले आहे.

    ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार आज भूमरे यांच्या हस्ते करण्यात आला. औरंगाबादेत पैठण तालुक्यातील सरपंचांचा सत्कार त्यांनी केला. येथे 35 पैकी 27 ग्रामपंचायतीवर भूमरे समर्थक सरपंच सत्तेत आले आहेत. यावेळी यावेळी ते बोलत होते.

    भूमरे म्हणाले, संजय राऊत फक्त आरोप करतात. एकदा यांनी दाखवून द्यायला पाहिजे. आमच्यावरचे आरोप सिद्ध करावेत. आमची चौकशीला तयारी आहे. संजय राऊतांकडून केवळ आमची बदनामी सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतच जनता आमच्या सोबत आहे, हे दिसून आलंय. खोके हा विषय नाही, अशी प्रतिक्रिया भूमरे यांनी दिली.

    पुढे बोलतांना भूमरे म्हणाले, ‘ त्यांना काही काम नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काही कामं केले हे सांगू शकत नाही. फक्त शिंदे शिवसेनेला बदनाम करायचं हा विडा त्यांनी उचलला आहे. ठाकरे गट हा चौथ्या क्रमांकावर गेला आहे. त्यातूनच दिसतंय, जनतेचा युतीवर आणि ठाकरे गटावर किती विश्वास आहे.

    एकनाथ शिंदेंवर भूखंड घोटाळ्याची कागदपत्र केंद्रीय तपास यंत्रणांच्या हाती लागली आहेत. तो दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा आरोप आहे. त्यावर बोलताना भूमरे म्हणाले, कुठेही घोटाळा झालेला नाही. जनतेसमोर शिंदेंना बदनाम करण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत.