कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील : अजित पवार

कामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

    बारामती : कामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

    उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते बारामती येथे नव्याने बांधण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

    यावेळी कामगार आयुक्त सुरेश जाधव, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चु. श्रीरंगम, अपर कामगार आयुक्त अभय गीते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, बांधकाम कामगार आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना पवार म्हणाले, कामगारांच्या अडचणी दूर करण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले पाहिजेत. कामगारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी असलेल्या योजनेचा लाभ त्यांना मिळणे आवश्यक आहे. काम करवून घेताना त्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे. कामगारांना विम्याचे संरक्षण कसे देता येईल, याकडेही संबंधितांनी लक्ष द्यावे असे निर्देश दिले.

    यावेळी पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कामगारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले व कामगारांना सुरक्षा कवच म्हणून साहित्याचे वाटप करण्यात आले.

    विविध विकासकामांची पाहणी

    पवार यांनी आज कालव्यालगतचे सुशोभीकरण व बाबूजी नाईक वाडा येथे चालू असलेल्या कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

    यानंतर कृषि विज्ञान केंद्र बारामती येथील राजीव गांधी सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरची पाहणी करून विविध वैज्ञानिक उपकरणांची माहिती घेतली. यावेळी प्रा. निलेश नलवडे यांनी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.

    यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी महेश रोकडे गटविकास अधिकारी अनिल बागल उपअभियंता सा. बा. वि. राहुल पवार आदी उपस्थित होते.