सीमा भागातील ८६५ गावांमधील संस्था, संघटनांना बळ देणार, मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय करणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय करण्याची तरतूद आहे. नव्या शासन निर्णयात यात सुधारणा करून आता सीमा भागातील ८६५ गावांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे.

    मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक (maharashtra karnatak) सीमा भागातील विविध संस्था आणि संघटना यांना मोठं बळ मिळणार आहे. या भागातील ८६५ गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था व संघटनांना देखील मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सीमा प्रश्नी नुकत्याच सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्था यांना महाराष्ट्राकडून अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.

    त्याप्रमाणे काल (24 नोव्हें) रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाधिकारातून राज्यातील विविध संस्था, संघटना यांना अर्थसहाय करण्याची तरतूद आहे. नव्या शासन निर्णयात यात सुधारणा करून आता सीमा भागातील ८६५ गावांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे २०२३-२४ करिता १० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.