“आम्हाला सोबत घेण्याची भाजपाची इच्छा दिसत नाही…, हरकत नाही आम्ही स्वबळावर लढू”; महादेव जानकर यांचा भाजपाला स्पष्टच इशारा, म्हणाले…

भाजप व शिंदे गटाच्या जागावापामध्ये घटक पक्षांना अधिक स्थान देण्यात आलं नाही, यावर रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाजपावर नाराजी व्यक्त करत टिका केली आहे.

मुंबई – आगामी लोकसभा (Loksabha) व विधानसभा निवडणुकीसाठी (Election) आतापासूनच अनेक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, जागावाटप तसेच जाग चाचपणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, मागील आठवड्यात मविआने लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत मुंबईत एक बैठक घेत, जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. तर दुसरीकडे आता भाजप व शिंदे गटाने देखील जागावाटपाबाबत रणनीती आखली असल्याचं समजते. दरम्यान, भाजप व शिंदे गटाच्या जागावापामध्ये घटक पक्षांना अधिक स्थान देण्यात आलं नाही, यावर रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाजपावर नाराजी व्यक्त करत टिका केली आहे.

…तर आम्ही स्वबळावर लढू

दरम्यान, भाजप विधानसभेच्या 240 जागा लढवणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं आहे. तर शिंदे गटाला फक्त 48 जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं शिंदे गटाची घालमेल आणि अस्वस्था वाढली आहे. तर घटक पक्षांनीही त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी या जागावाटपाबाबत स्पष्ट व थेट भूमिका मांडली आहे. “जागावाटपासाठी आमचा विचार केला नाही. शिंदे गट आणि भाजप एकत्र मिळून निवडणूक लढणार आहेत. त्यांना आम्हाला सोबत घेण्याची इच्छा दिसत नाही. आम्हाला सोबत घ्यायचं नसेल तर हरकत नाही. आम्ही स्वबळावर लढू”, असं महादेव जानकर म्हणाले.

काय म्हणाले जानकर?

पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले की, गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात माझ्या पक्षाला टेक्निकली मान्यता मिळाली आहे. जर भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वबळावर लढू. महाराष्ट्रात माझे आतापर्यंत चार आमदार झाले. आता आम्ही दोन आमदार आहोत. मी वरच्या सभागृहात आहे. आपल्या चौकात, आपली औकात वाढवली पाहिजे. असं महादेव जानकर यांनी सांगितलं.