आमच्या जिल्ह्यातला उमेदवार निवडून आल्याचा आनंद : राजू शेट्टी

भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

  कराड : भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. राज्यसभा निवडणुकीत आमच्या जवळचा व जिल्ह्यातला उमेदवार निवडून आल्याचा आनंद झाल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

  येथील पंकज हॉटेल येथे राजू शेट्टी आणि धनंजय महाडिक यांची भेट झाली. याप्रसंगी त्यांनी महाडिक यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

  राजू शेट्टी म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत आमच्या जवळचा व जिल्ह्यातला उमेदवार निवडून आला आहे. धनंजय महाडिक हे आमचे चांगले मित्र आहेत. सध्या आम्ही भाजप आणि महाविकास आघाडी पासूनही लांब आहोत; स्वतंत्र आहोत. त्यामुळे एका मित्राचा विजय झाल्याचा आम्हाला नक्कीच आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  स्वाभिमानीमधून भुयारांची आधीच हकालपट्टी केली

  आमदार देवेंद्र भुयार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा काहीही संबंध नाही. परंतु, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी आम्हाला स्वाभिमानीच्या देवेंद्र भुयार यांचे मत पडले नाही, अशा केलेल्या आरोपावर माझा आक्षेप आहे. खरेतर या अगोदरच आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटने धून देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी केली आहे. तसेच महाविकास आघाडीशी असलेले संबंधही आम्ही यापूर्वीच तोडलेले आहेत. त्यामुळे घोडेबाजाराचा आरोप होत असताना कुठेतरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाव घेणे बरोबर नसल्याचे मतही राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.

  खासदार महाडिक यांचा शेट्टींना वाकून नमस्कार

  कराड येथील पंकज हॉटेलमध्ये प्रवासादरम्यान राजू शेट्टी आणि भाजपचे राज्यसभेचे नूतन धनंजय महाडिक यांची भेट झाली. यावेळी राजू शेट्टी यांनी महाडिक यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

  याप्रसंगी धनंजय महाडिक यांनी राजू शेट्टींच्या पाया पडले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.