देश‍ाचा विकास करण्याचा संकल्प आपण घेतला असून तो नक्कीच यशस्वी होईल – मनपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ समयी बोलताना आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी देश‍ विकसित होण्याचा संकल्प आपण घेतला असून तो नक्कीच यशस्वी होईल, असे प्रतिपादन मंगळवारी केले.

    महिलांना मुख्य प्रवाहात आणून राजकीय, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच विविध योजनांच्या माध्यमातून लोकांना रोजगार कशा प्रकारे देता येईल, याचे नियोजन या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे, अशी माहिती आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी यावेळी बोलताना दिली. यासमयी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी नागरीकांसाठी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुष्मान भारत, डिजीटल हेल्थ कार्ड, राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम, पीएम स्वनिधी योजना, उजाला योजना, आरोग्य तपासणी इ. विविध शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शासनाच्या डिजीटल वाहनावर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रिनद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना दाखविण्यात आली. शासनाची ही डिजीटल व्हॅन दि. ०५ डिसेंबर ते ०७ डिसेंबर २०२३ या कालावधीत महापालिकेच्या प्रभागातील लाभार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करुन देणार आहे.