आमचे भाजपमधील अनेक नेत्यांबरोबर कौटुंबिक संबंध , राजकीय मतभेद जरूर; मन मतभेद कोणाशीही नाहीत

आमचे राजकीय मतभेद जरूर आहेत, मात्र पवार कुटुंबीयांचे कोणाशीही मनभेद नाहीत, देशातील अनेक भाजप मधील नेत्यांशी आमचे कौटुंबिक संबंध सलोख्याचे आहेत, असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

    बारामती: आमचे राजकीय मतभेद जरूर आहेत, मात्र पवार कुटुंबीयांचे कोणाशीही मनभेद नाहीत, देशातील अनेक भाजप मधील नेत्यांशी आमचे कौटुंबिक संबंध सलोख्याचे आहेत, असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
    बारामती येथील गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत.यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार सुळे यांनी राजकीय भूमिका वेगळी असली तरी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत, असे सांगत त्या म्हणाल्या, जेव्हा आपलं वय वाढत त्यावेळी आपली वैचारिक प्रगल्भताही वाढली पाहिजे. नाती एका बाजूला आहेत, तर राजकीय भूमिका एका बाजूला आहे. आमची लढाई वैचारिक आहे, आमची लढाई वैयक्तीक नाही. भाजप मधील अनेक नेते आहेत, त्यांचे पवार कुटुंबासोबत सलोख्याचे संबंध चार ते पाच दशकांचे आहेत. यामध्ये प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे, राजनाथसिंह, सुषमा स्वराज यांच्यासह अनेक कुटुंबाशी सलोख्याचे संबंध आहेत.त्यामुळे राजकीय मतभेद आहेत, मात्र आमचे कोणाशीही मनभेद नाहीत, असा पुनरुच्चार खा.सुळे यांनी यावेळी केला.अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याच्या प्रश्नावर त्यांनी याबाबत अजितदादा सांगू शकतील, असे खा सुळे म्हणाल्या.