आम्ही सत्तेसाठी हापपलेलो नाही, विरोधक सैरभर पळताहेत; अजित पवारांची टीका

आमची महायुती भक्कम आहे. तर विरोधकांच्यात एकवाक्यता आणि ताळमेळ नाही. ते सैरभर पळत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपुरात केली.

  इस्लामपूर : आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही. सत्ता येते आणि जात असते. ताम्रपट कोणी घेऊन जन्माला आलेले नाही. पण बहुजन समाजातील शेवटच्या माणसाचे प्रश्न सुटले पाहिजेत हा दृष्टिकोन ठेवून आम्ही ५०-५२ आमदारांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्याची राज्यभर स्वागताच होत आहे. आमची महायुती भक्कम आहे. तर विरोधकांच्यात एकवाक्यता आणि ताळमेळ नाही. ते सैरभर पळत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपुरात केली.

  अजित पवार म्हणाले,” सामान्य नागरिकांची कामे व्हावीत यासाठी शिंदे सरकाराला पाठिंबा दिला आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकरी, विविध घटकांना न्याय देण्याचे काम करत आहोत. अनेक सरकारमधील पंतप्रधान बघितले आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नाव जगात पोहचवले आहे. येत्या चार वर्षात आपल्या देशाची जगात सर्वोत्तम अर्थव्यवस्था असणार आहे.

  ते म्हणाले,” १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी आम्ही ज्युनिअर होतो. आम्ही आमच्या ताकदीवर काम केले. त्यातून महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन केला वेगळी ओळख निर्माण केली. असे असले तरी आपले पाय जमिनीवर असायला हवेत. सामान्यांचा विश्वास संपादन करायला हवा ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व वसंतदादा यांची शिकवण कायम डोक्यात ठेवून वाटचाल करीत आहोत.” अस अजित पवार म्हणाले.

  पुढे बोलताना ते म्हणाले, इस्लामपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिस मधून सामान्य माणसांना न्याय मिळेल. तुमचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी आता नव्याने व्यवस्था उपलब्ध केली आहे. मी पाच वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळात वेगळ्या पदांवर काम करीत आहे. शेतकरी आमची जात आहे. शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आलो आहे. त्याचे प्रश्न सोडवण्यावर भर आहे. शेतकऱ्यांकडे जर पैसा आला तरच बाजारपेठेत चांगले दिवस येतील. मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य आहे.”

  जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळला…!

  राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच इस्लामपूर मतदारसंघात आले होते. राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर काय टीकास्त्र सोडणार याबाबत उपस्थिती नागरिकांना प्रचंड उत्सुकता होती. अजित पवार यांनी राज्य सरकारची भूमिका आणि केंद्र सरकारच्या विकास कामांचे व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. क्रांतिकारकांच्या वाळवा तालुक्यातील नायकवडी कुटुंबाबद्दल ही बोलले. मात्र माजी मंत्री जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळला.

  लेट पण थेट माईकचा ताबा..!

  नियोजित वेळेपेक्षा उशिराने कार्यक्रम सुरू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यालयाच्या उद्घाटनानंतर सभास्थळी येत व्यासपीठावरील माईकचा थेट ताबा घेतला. स्वागत प्रास्ताविक न होताच अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कष्टकऱ्यांच्या व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबद्दल बैठक झाल्याने यायला थोडा उशीर झाला असे सांगत १८ मिनिटांचे भाषण केले. अजित दादांचे भाषण म्हणजे चौफेर टोलेबाजी याचा अनुभव यावेळी आला नाही. भाषणादरम्यान व्यासपिठावर सर्व जण उभेच राहिले होते.