आम्ही पवारांना सोडून कुठेही गेलेलो नाही, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

    पुणे : आम्ही पवारांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते होते आणि राहतील’ असे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नमूद केले. तसेच पक्षातील फुटीनंतर वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचा राजीनामा देण्यापासून शरद पवार साहेबांनीच परावृत्त केल्याचा गाैप्यस्फाेटही त्यांनी केला.

    साखर कारखान्याचा राजीनामा देण्यापासून शरद पवार यांनीच परावृत्त

    राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे मांजरी येथील ‘व्हीएसआय’ येथे आयोजित चर्चासत्राच्या निमित्ताने शरद पवार आणि मंत्री वळसे पाटील हे प्रथमच एका व्यासपीठावर आले हाेते. यानंतर पत्रकारांशी वळसे पाटील यांनी  वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचा राजीनामा देण्यापासून शरद पवार यांनीच परावृत्त केल्याच्या चर्चेला दुजाेरा दिला. ते म्हणाले, ‘‘हा प्रश्न व्यक्तिगत आहे, पण मला काम करायला सांगितले ही गोष्ट खरी आहे.

    कोणताही अवघडलेपणा नव्हता

    पवारांसोबतच्या कार्यक्रमात कोणताही अवघडलेपणा नव्हता. या चर्चासत्रासाठी सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक व अधिकारी उपस्थित होते. याच वेळी चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार येथे येऊ शकले नाही. मी या चर्चासत्राला हजर होतो. केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सहकार कायद्यात बदल करण्यासाठी एक मसुदा तयार केला जात आहे. यासंदर्भात शरद पवारांची चर्चा करणार आहोत’’ असेही त्यांनी नमूद केले.