आम्ही दिवाळी एकत्रच साजरी करणार; राजकीय मतभेद व कौटुंबिक नाते वेगळे : सुप्रिया सुळे

  बारामती : राजकीय मतभेद वेगळे व कौटुंबिक नाते वेगळे, त्यामुळे आम्ही सर्व पवार कुटुंबीय एकत्रच नेहमीप्रमाणे गोविंदबागेत दिवाळी साजरा करणार असल्याचे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
  अजित पवार यांचा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय
  नवरात्रोत्सवानिमित्त बारामती शहरातील माळावरची देवी या ठिकाणी मंदिरात दर्शनासाठी खा. सुळे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेऊन ते सत्तेत सहभागी झाल्याने यावेळी दिवाळीत सर्व पवार कुटुंबीय एकाच ठिकाणी येत कार्कर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर खा सुळे यांनी आम्ही सर्व जण एकत्रच दिवाळी साजरा करणार असल्याचे सांगितले.
  इमारतीच्या उद्घाटनासाठी दोन्ही पवार एकत्र येणार का
  भिगवण परिसरात विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी शरद पवार, अजित पवार व तुम्ही एकत्र येणार का, या प्रश्नावर खा. सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नसल्याचे स्पष्ट केले. काही सहकारी वेगळया विचाराच्या पक्षात गेले, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. विद्या
  प्रतिष्ठान व ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्था सामजिक संस्था सामाजिक काम करतात. दोन्ही संस्थांच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय कुटुंब म्हणून नेहमीच एकत्र आले आहे, त्याला राजकीय रंग देणे योग्य नसल्याचे खा. सुळे यांनी सांगितले.
  राज्यातील मायबाप जनतेचे हक्काचे घर
  गोविंदबाग राज्यातील मायबाप जनतेचे हक्काचे घर आहे. ते कायमच खुले आहे, तेथे कोणीही कधीही येऊ शकते, नेते म्हणून नाही तर कौटुंबिक नाते म्हणून आम्ही दिवाळीत एकत्र येणार आहोत. आमच्याच राजकीय मतभेद जरूर आहेत. परंतु राजकीय मतभेद व कौटुंबिक जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असतात. राजकारणात कोणीही कुटुंबातील नाती, जबाबदारी डावलू नये, या मताची मी आहे. या दोन गोष्टीत गल्लत करू नये. जेथे राजकीय लढाईचा विषय येईल, तेथे ती पूर्ण ताकदीने लढू, परंतु कुटुंबाचा विषय असेल तर राजकारण बाजूला ठेवू. – खासदार सुप्रिया सुळे