लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या खासदारकीच्या 19 जागा आम्ही लढवणार, राऊतांचे विधानामुळे मविआमध्ये वादंग

    नांदेड : शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रांड नेते संजय राऊत यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये कलगी-तुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेना ठाकरे गट मागील 2019 मधील जिंकलेल्या सर्व जागा लढवणार आहे. आणि या सर्व जागा आम्ही निवडून आणणार. असा टोला त्यांनी शिंदे गटाला आणि भाजपला लगावला आहे.

    कॉंग्रेस जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात :

    यामध्ये आता कॉंग्रेस पक्षाने आक्षेप घेत, त्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अजून जागा वाटपावर कोणताच निर्णय झालेला नाही. तसेच, जागा वाटपासंबंधी बैठकसुद्धा झालेली नाही. त्यामुळे आता यावर कोणीही बोलणे योग्य नाही.

    कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केली नाराजी

    यावर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करीत, जागा वाटपावर अजून कोणतीही मिटींग झालेली नसताना संजय राऊतांनी बोलणे योग्य नाही. तसेच, आम्ही यावर अजून कोणतीही चर्चा केली नाही. त्यामुळे यावर काहीही बोलणे योग्य नाही.

    फडणवीसांना जोरदार टोला : 

    फडणवीसांनी काल उद्धव ठाकरेंना मारलेल्या टोल्यावर त्यांनी जोरदार टीका करीत, ते झोपलेल्या लोकांसमोर भाषण करीत होते, असे सांगितले. अशा झोपाळू आणि मेलेल्या कार्यकारिणीसमोर भाषण केल्याने कोणीही वाघ होत नाही. कोणाचा पोपट मेला हे लवकरच कळणार आहे, तुम्ही फक्त 14 महापालिकेच्या निवडणुका घ्या, मग कळेल, असे प्रतिआव्हानदेखील दिले.