कोकरेंच्या गो-सेवेला सहकार्य करू, केंद्रीयमंत्री ना. नारायण राणे यांची कोकरेंना दिली ग्वाही

श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान लोटे गो शाळा आयोजित गो संमेलनाच्या समारोप समारंभप्रसंगी ते बोलत होते

  चिपळूण – संतोष सावर्डेकर : गो सेवा पवित्र कार्य असून या सेवेबद्दल ह. भ. प. भगवान कोकरे यांचे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी कौतुक करीत ते करीत असलेल्या सेवेला आमचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. तर कोकणातील तरुण व महिलांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे असे देखील आवाहन केले.

  श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान लोटे गो शाळा आयोजित गो संमेलनाच्या समारोप समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी या संस्थानतर्फे केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गो संमेलन २६ ते २८ जानेवारी दरम्यान लोटे येथे पार पडले.

  यावेळी ना. नारायण राणे म्हणाले की, गो रक्षण, गो पालन ही महत्वाची सेवा आहे. या सेवेमुळे तुमच्या जीवनात नक्कीच सफलता येईल. गोवंशच्या शेणापासून खत, गॅस, वीज निर्मिती तर गोमूत्रापासून औषधे देखील उत्पादित केली जातात. यामुळे कोकरें हजार गायी सांभाळीत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे, अशा या माणसाचा सन्मान केला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, ही गो सेवा करतांना विरोध, ही बाब चुकीची असून ते गोवंश कसाईकडे जाऊ देत नाहीत, हे केवढे मोठे काम आहे. गो सेवा करतांना दूध देणारी देखील जनावरे बाळगली तर शासनाकडे मदत मागण्याची वेळ येणार नाही. तसा गुजरातमधील गोशाळेचा प्रकल्प पहावा, असा सल्ला नारायण राणे यांनी कोकरेंना दिला. या गो सेवेबाबत तुम्ही बिनधास्त रहा, गो शाळेच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही ह. भ. भगवान कोकरे महाराज यांना दिली.

  ते पुढे म्हणाले की, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग विभागांर्गत हजारो व्यवसाय येतात. या विभागातील योजनांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण-महिला घेतांना दिसत आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील तरुण व महिलांनी देखील व्यवसायाच्या दृष्टीने पुढे आले पाहिजे, आपण नक्कीच सहकार्य करू, असे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरडोई उत्पन्नाचा दाखला देतांना रत्नागिरी जिल्ह्यात देखील हे चित्र बदलले पाहिजे. औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तरच याठिकाणी उद्योगधंदे येतील, असे सांगताना सूक्ष्म, लघु, उद्योग विभागातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०० कोटींचे ट्रेनिंग सेंटरचे काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यादेखील यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

  तर माजी खासदार व भाजपा नेते निलेश राणे यांनी ह. भ. प. भगवान कोकरे करीत असलेल्या गोसेवेचे कौतुक करून तुम्ही गोमतेचे रक्षणकर्ते आहात, यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली. तर ही गोसेवा करीत असताना त्यांना किती अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला मात्र ते गोसेवेपासून मागे हटले नाहीत. हा माणूस लढवय्या आहे, अशा शब्दात कोकरेंचे निलेश राणे यांनी कौतुक केले. तर यावेळी काहीजण आपण मागाहून निखारा असल्याचे दाखवत आहेत. मात्र, हा निखारा या जन्मीच विझवणार, असा टोला अप्रत्यक्षपणे आ. भास्कर जाधव यांचे नाव न घेता टोला हाणला.

  यावेळी महाराष्ट्र राज्य गो सेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी आपले मनोगत मांडले. तर प्रास्ताविकात गोसेवक ह. भ. प. भगवान कोकरे यांनी माजी खासदार निलेश राणे करीत असलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या वेळी गोशाळेच्या जागेबाबत उपोषण केले. त्यावेळी राणे यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले. यानंतर आपणाला उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असे देखील यावेळी नमूद करण्यास ते विसरले नाहीत.

  यावेळी गोशाळेचे अध्यक्ष संजय पांडे, विजय जगताप, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा शीतल रानडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, संदीप कदम, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. धनंजय जगदाळे, किशोर चौगुले, शिवाजी ईरमाळी कुरवळ सरपंच संजय लाड, गुजरात बडोदा किरण सुर्वे, दिलीप चाळके, दत्ताराम आयरे, दत्ता जाधव, भाऊ जाधव, गिरीश पाटील, नरेश जगताप, शिवाजी कळसे, संदेश भालेकर, प्रफुल्ल पिसे आदी उपस्थित होते.