…अन् सजवलेल्या बैलगाडीत निघाली वधू-वराची मिरवणूक

लग्न वरातीत आता बैलगाडीला पसंती मिळत असल्याने बैलगाडी मालकाला अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळाले.

    अकोले : विनायक शेजल यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढून नातेवाईकांनी कोळी गीताच्या रिमिक्स गाण्यावर ठेका धरला. मे महिन्यात लग्नाची मोठी तिथ असून अकोले तालुक्यातील आदिवासी भागात लग्नाचा धूमधडाका सुरू आहे.

    मंगल कार्यालय अपुरे पडू लागली आहेत. लग्नात नवनवीन कल्पना काढून नवरदेवाची मिरवणूक काढण्यात येते. राजूर येथे अक्षय मंगल कार्यालयात मवेशी येथील विनायक कोंडार व शेजल यांचे शुभ विवाह संपन्न झाला. मात्र नातेवाईकांनी वधू-वरांची मिरवणूक चक्क बैलगाडीतून काढली.

    खिल्लारी बैलजोडी तिच्यावर रंगीत झुला व बैल जोडीचा कासरा वधू वरांच्या हातात देऊन नऊवारी नेसलेल्या महिलांनी बैलगाडीसमोर रिमिक्स व कोळी गीत लावून त्यावर ठेका धरला. त्यामुळे मिरवणूक पाहण्यास अबालवृद्धांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

    बैलगाडा मालकाला ‘अच्छे दिन’

    लग्न वरातीत आता बैलगाडीला पसंती मिळत असल्याने बैलगाडी मालकाला अच्छे दिन आल्याचे पाहायला मिळाले.