शोरूममध्ये शेड बनवण्याचे काम करताना वेल्डर पडला खाली; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने झाला मृत्यू

घाट रोडवरील एका शोरूममध्ये शेड बनविण्याचे काम करत असताना खाली पडल्याने वेल्डरचा मृत्यू झाला. या प्रकरणात निष्काळजीपणा पुढे आल्याने गणेशपेठ पोलिसांनी शोरूम व्यवस्थापक आणि कंत्राटदारासह तिघांवर गुन्हा नोंदवला आहे.

    नागपूर : घाट रोडवरील एका शोरूममध्ये शेड बनविण्याचे काम करत असताना खाली पडल्याने वेल्डरचा मृत्यू झाला. या प्रकरणात निष्काळजीपणा पुढे आल्याने गणेशपेठ पोलिसांनी शोरूम व्यवस्थापक आणि कंत्राटदारासह तिघांवर गुन्हा नोंदवला आहे. आरोपींमध्ये कंत्राटदार दीपक ज्ञानीराम बठाले (वय 36, रा. विजयनगर, वानाडोंगरी), बंडू कवडू अवचट (वय 47, रा. साईराम चौक) आणि घाट रोडवरील हुंदई कार शोरूमच्या व्यवस्थापकाचा समावेश आहे.

    कार शोरुमच्या व्यवस्थापकाने परिसरात शेड बनवण्याचे कंत्राट दीपक आणि बंडू यांना दिले होते. मृतक उमेश्वर अशोक गणवीर (वय 24, रा. मातोश्रीनगर, वानाडोंगरी) हा त्यांच्याकडे वेल्डरचे काम करत होता. मंगळवारी दुपारी उमेश्वर शेडवर चढून वेल्डिंगचे काम करत होता. या दरम्यान तोल गेल्याने तो खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारार्थ मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान उमेश्वरचा मृत्यू झाला.

    पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. काम करताना उमेश्वरच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्याला ना हेल्मेट देण्यात आले, ना सेफ्टी बेल्ट. उमेश्वरची पत्नी आरती गणवीर हिने कंत्राटदार आणि व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे तिच्या पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली.