‘या’ प्रकरणी ममता बॅनर्जी यांची उच्च न्यायालयात धाव; पुढील आठवड्यात सुनावणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) मंगळवारी धाव घेतली आहे.

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) मंगळवारी धाव घेतली आहे. ममता यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर नव्याने निर्णय घेण्याचे आदेश विशेष न्यायालयाच्या दिले होते. त्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांनी आव्हान दिले आहे.

मुंबईतील एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या शेवटी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बसून राष्ट्रगीतचा अवमान केल्याप्रकरणी शिवडी येथील माझगाव दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली. दंडाधिकारी न्यायालयाने २ मार्च २०२२ रोजी ममता बॅनर्जी यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या समन्सला ममता बॅनर्जी यांनी जेष्ठ कायदेतज्ज्ञ माजिद मेमन यांच्यामार्फत मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

ममता बॅनर्जी या एका राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्याचा कारभार चालविण्यास त्या व्यग्र असल्यामुळे त्यांना खटल्याला अनुपस्थित राहण्यास मुभा आहे, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने शिवडी दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावण्याच्या निर्णय रद्दबातल केला आणि याचिकेवर नव्याने विचार करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाला ममता बॅनर्जी यांना आव्हान दिले आहे. विशेष न्यायालयाने समन्स रद्द करायला हवे होते आणि प्रकरण पुन्हा दंडाधिकार्‍यांकडे पाठवायला नको होते, असा दावा याचिकेतून केला आहे. याचिकेवर २७ मार्च रोजी एकलपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.