भारतीय खाद्य संस्कृतीवर पाश्चिमात्याचा प्रभाव ! रुचकर, पाचक व आरोग्यवर्धक पदार्थांचा विसर

भावी पिढीला या जुन्या खाद्यसंस्कृतीचे व राहणीमानाची माहिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्याकडे सर्व रुचेल, पचेल असे चांगले त्यातही आरोग्यवर्धक पदार्थ असताना देखील आपण त्यापासून फारकत का घेत आहोत ? हे मात्र, न उलगडणारे कोडे आहे.

    शिरपूर : गत काही वर्षापासून आपल्या भारतीय संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृती जबरदस्त प्रभाव पडत आहे. भारतीय माणसाचे खाणे, पिणे, पोशाख, राहणीमान, सण-उत्सव यामध्ये त्याचा प्रभाव दिसून येतो. आज आपल्या आहारातील अनेक खाद्यपदार्थ दिसेनासे झाले आहे.

    भारतात विविध ऋतूत वेगवेगळा आहार घेतला जातो. यानुसार भाजीपाला, फळे निसर्गतः उपलब्ध होत, असे हिवाळ्यात हिरवा भाजीपाला, उन्हाळ्यात कडधान्याचे पदार्थ खाणे शरीराला पोषक असायचे. यामध्ये वड्या, मूग, उडीद या पासून तयार केलेले पदार्थ आहारात असायचे. विदर्भात तीव्र उष्णता असल्याने आंब्याचे पन्हे, पोपट, तुरीच्या घुगऱ्या, ताक, दही, माठाचे थंडपाणी याचा वापर अधिक व्हायचा. लग्नसमारंभात पानाच्या पत्रावळी ची पंगत, त्यात म्हटले जाणारे श्लोक, झाडाच्या डहाळयाचा मांडव असे पारंपरिक प्रकार लग्नघरी हमखास होते.

    आज लग्नात तयार केलेले विविध पदार्थांचे रुखवंत क्वचितच दिसून येत आहेत. लग्नातील सनईचे सुमधूर सूर कर्णकर्कश्श डीजेच्या आवाजात केव्हाच हरवून गेले आहेत. शांत बसून जेवण करण्याची जागा आज बफेच्या कोलाहलाने घेतली आहे. घरातील पाहुनचाराचे स्वरूप बदलले आहे. घरी पाहुणा आला की, पुरणपोळी, बासुंदी, आंब्याचा रस ,केळाचे शिकरण, तांदळाचे पापड आदी पदार्थ असायचे. आज या पदार्थाची जागा रसगुल्ले, गुलाब जामून, श्रीखंड, रबडी, जिलेबी ने घेतली आहे. परंतु, लग्नसोहळ्यात कधीकाळी गरिबीचे प्रतिक ठरलेले खाद्यपदार्थ झुणका – भाकरी, वांग्याचे भरीत आता मात्र, श्रीमंताचे खाद्यपदार्थ असलेल्या बुफेच्या रांगेत स्थान मिळवले आहे.

    आज लग्नसमारंभातील भोजन कक्षाकडे नजर टाकली तर, सर्वाधिक गर्दी चायनीज, नूडल्स ,मंचूरियन, आईस्क्रीम या अन्य पदार्थाकडे दिसून येते. यात महिला, भगिनी, युवापिढी यांची संख्या जास्त आहे. घराघरातील सकाळचा नाश्ता सुद्धा बदलला आहे. ग्रामीण भागात पूर्वी याला न्याहारी म्हणायचे, यामध्ये साधारणत रात्रीची भाजी, पोळी, शेवया, चहा, पोळी उकडपेंडी, शिरा असे पदार्थ असायचे. आता प्लेटमध्ये डोसा, पकोडे, उपमा, बटर ब्रेड, ऑम्लेट , ब्रेड पकोडा या पदार्थांचे अतिक्रमण झाले आहे. पोशाखातही मोठा बदल झालेला आहे. नाएटी, टी-शर्ट, बर्मुडा, जीन्स पॅन्ट, स्पोर्टशूज असे नवनवीन प्रकार आल्याचे दिसून येतात. एकंदरीत विचार केल्यास आज आपण प्रत्येक बाबतीत पाश्चिमात्याचे अनुकरण करण्याच्या भानगडीत आपल्या भारतीय संस्कृतीच्या अनेक चांगल्या गोष्टी मात्र विसरत आहोत.

    भावी पिढीला माहिती देण्याची गरज

    भावी पिढीला या जुन्या खाद्यसंस्कृतीचे व राहणीमानाची माहिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपल्याकडे सर्व रुचेल, पचेल अस चांगलं त्यातही आरोग्यवर्धक पदार्थ असताना देखील आपण त्यापासून फारकत का घेत आहोत ? हे मात्र, न उलगडणारे कोडे आहे.