साताऱ्यात एलसीबी कडून व्हेल माशाची उलटी जप्त ; आरोपींकडून ॲम्बुलन्सचा वापर, उलटीची किंमत पाच कोटी त्रेचाळीस लाख दहा हजार रुपये

पुणे बेंगलोर महामार्गावर वाढे गावच्या हद्दीत टोयोटा शोरूमजवळ स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून रुग्णवाहिकेतून व्हेल माशाची उलटी घेऊन जाणाऱ्या चौघांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अंबर ग्रीस या उलटीची किंमत पाच कोटी त्रेचाळीस लाख दहा हजार रुपये इतकी आहे या प्रकरणातील चौघांकडे कसून चौकशी सुरू आहे.

    सातारा : पुणे बेंगलोर महामार्गावर वाढे गावच्या हद्दीत टोयोटा शोरूमजवळ स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून रुग्णवाहिकेतून व्हेल माशाची उलटी घेऊन जाणाऱ्या चौघांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अंबर ग्रीस या उलटीची किंमत पाच कोटी त्रेचाळीस लाख दहा हजार रुपये इतकी आहे या प्रकरणातील चौघांकडे कसून चौकशी सुरू आहे.

    याबाबतची अधिक माहिती अशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना काही गोपनीय मुद्देमाल गुपचूप रित्या साताऱ्यातून नेला जाणार असल्याची गोपनीय खबर खबऱ्यामार्फत मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्ग परिसरात सापळा रचला. महामार्ग परिसरातील टोयोटा शोरूमच्या समोर पुणे बाजूने सर्विस रोडवर एका रुग्णवाहिकेला पोलिसांनी अडवून संबंधित चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. रुग्णवाहिकेची तपासणी केली असता एका काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये तपकिरी रंगाचा ओबडधोबड पदार्थ आढळून आला वनविभागाच्या सहकार्याने या पदार्थाची तपासणी केली असता तो पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे स्पष्ट झाले. या पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत ५ कोटी ४३ लाख १० हजार रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले.

    या प्रकरणी सिद्धार्थ लकडे, वय ३१, राहणार कासारविली, अनिस इसा शेख, वय ३८, राहणार हुपरी, हातकणंगले, नासिर अहमद रहमान राऊत, वय ४० राहणार भडकंबा, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, किरण गोविंद भाटकर, वय ५० राहणार भाटीये, रत्नागिरी या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईचे कौतुक होत आहे या चौघांवर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ च्या ३८, ४३, ४४, ४५, ४८, आणि ५१ नुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.