मावळचे खासदार करतात काय?; श्रीरंग बारणे यांच्या विरोधात फलकबाजी

“पिंपरी चिंचवड, लोणावळा, खंडाळा खारघरपर्यंत आपला मतदार संघ आहे. यांची जाणीव आपल्या खासदारांना केव्हा होणार? बोला खासदार साहेब बोला.. काहीतरी बोला..!’’ असा संतप्त सवाल मावळातील रेल्वे प्रवाशांनी खासदार श्रीरंग बारणे यांना केला आहे.

    वडगाव मावळ : “पिंपरी चिंचवड, लोणावळा, खंडाळा खारघरपर्यंत आपला मतदार संघ आहे. यांची जाणीव आपल्या खासदारांना केव्हा होणार? बोला खासदार साहेब बोला.. काहीतरी बोला..!’’ असा संतप्त सवाल मावळातील रेल्वे प्रवाशांनी खासदार श्रीरंग बारणे यांना केला आहे. रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवा, अन्यथा मतदान करणार नाही अशा इशारा देखील दिला आहे. याबाबत “आमचे मावळचे खासदार करतात काय?” या शीर्षकाखाली लोणावळा शहरात जागोजागी फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

    कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून बंद असलेल्या पुणे-लोणावळा लोकल चालू का? होत नाहीत. विद्यार्थी, पेशंट, कामगारवर्गाचे हाल यांना दिसत नाहीत का? रेल्वे प्रवाशांची संख्या वाढून सुद्धा गेल्या दहा वर्षात एक सुध्दा नविन पुणे-लोणावळा लोकल का चालु झाली नाही? कोरोना अगोदर मुंबईतून सुटणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेस, कन्याकुमारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्या मुंबईतून का सुटत नाहीत? ‘डेक्कनची राणी’ व ‘डेक्कन एक्सप्रेस’ च्या कोव्हीडमध्ये काढलेल्या लोणावळा बोगी’ पुन्हा का लावल्या जात नाहीत?

    मावळवासीयांसाठी सोयीची असणारी ‘पुणे-भुसावळ’ एक्सप्रेस एका महिला खासदाराने अमरावतीला पळवून नेली, तेव्हा आपले खासदार काय करत होते. सर्व एक्सप्रेस गाड्या लोणावळा-कर्जत रेल्वे स्टेशनवर का थांबविल्या जात नाहीत, अजून किती रेल्वे प्रवाशांचे बळी जायची वाट पहात आहेत? दरम्यान, लोणावळा रेल्वे स्टेशनवर पुण्याच्या बाजुला नविन पादचारी पुलाची आवश्यकता आहे, तो केव्हा होणार मुंबई-नाशिक-मनमाडच्या सर्व रेल्वे गाड्या 21-23 बोगींच्या होऊ शकतात, तर मुंबई-पुणे चालणाऱ्या रेल्वेगाड्या 21-23 बोगींच्या का होऊ शकत नाही? अशा प्रश्नांची सरबत्ती शहरात जागोजागी लावलेल्या फलकांच्या माध्यमातून खासदार बारणे यांच्यावर करण्यात आली आहे.

    प्रवाशांची न्यायालयात धाव

    प्रशासनाकडे दाद मागूनही अपयश आल्याने अखेर संतप्त प्रवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुणे – मुंबई – पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या पुणे प्रवासी संघाचे प्रतिनिधी शेखर डेरे व इतर ५० प्रवाशांनी ही याचिका दाखल केली आहे. मात्र हे करीत असतानाच या प्रवाशांनी खासदार बारणे यांच्या विरोधात देखील आपला मोर्चा काढला असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.