राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचं मोठ विधान, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. आता शरद पवार यांनी राष्ट्रपदी पदाच्या उमेदवारीबाबत भाष्य केलं आहे. आपण राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

    मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतीपदावर कोणता उमेदवार असावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बैठका सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देशाचे राष्ट्रपती व्हावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

    दरम्यान, आता शरद पवार यांनी राष्ट्रपदी पदाच्या उमेदवारीबाबत भाष्य केलं आहे. आपण राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. यादरम्यान मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असं स्पष्ट केलं आहे. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे.

    युपीएकडून राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचे नाव निश्चित झाले तर आमचे समर्थन असणार, असं वक्तव्य अगदी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं होतं. त्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सुद्धा शरद पवारांचं नाव सूचवलं असल्याचं समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच शरद पवार यांचे नाव समोर केले आहे.

    शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली होती. दरम्यान, एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, आता शरद पवारांनी आपण या स्पर्धेत नाही असं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार विरोधकांमध्ये चर्चा व्हावी यासाठी पुढाकार घेणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या 15 जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती दर्शवली आहे.