खासदार अमोल कोल्हेंचे नेमके चालले काय ? खासदार अमोल कोल्हेंची मतदार संघातच संघर्ष यात्रेत दांडी

दररोज वीस किलोमीटर पायी प्रवास करत हि युवा संघर्ष यात्रा शिरुर मतदार संघातून पंचेचाळीस दिवसांनी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात पोहोचणार आहे, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात युवा संघर्ष यात्रा डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदार संघातून पायी निघालेली असता चक्क खासदार कोल्हे यामध्ये गैरहजर आहेत.

    शिक्रापूर : शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे अनेकदा मतदार संघातील विविध कार्यक्रमांमध्ये नेहमीच गैरहजर असल्याचे दिसून येत असताना सध्या राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रेची सुरुवात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघातून केलेली असताना देखील खासदार डॉ. अमोल कोल्हेंची यामध्ये दांडी असल्याने खासदारांचे नेमके चालले काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

    राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी राज्यातील युवकांसह शेतकऱ्यांचे आणि अनेक घटकांचे विविध प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने नुकतेच खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदार संघातील तुळापुर येथून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होऊन त्रिवेणी संगमावर शंभू महादेवाला अभिषेक करत युवा संघर्ष यात्रेला सुरुवात केली असून या युवा संघर्ष यात्रेमध्ये शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, आर आर पाटील यांचे चिरंजीव युवा नेते रोहित पाटील, राष्टवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिरुर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी संचालक पंडित दरेकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव, ज्ञानेश्वर थेऊरकर यांसह आदी सहभागी झाले असून अनेक ठिकाणी या युवा संघर्ष यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे.

    दररोज वीस किलोमीटर पायी प्रवास करत हि युवा संघर्ष यात्रा शिरुर मतदार संघातून पंचेचाळीस दिवसांनी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात पोहोचणार आहे, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात युवा संघर्ष यात्रा डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतदार संघातून पायी निघालेली असता चक्क खासदार कोल्हे यामध्ये गैरहजर आहेत. तसेच यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये आमदार रोहित पवार यांनी याच मतदार संघात वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन केलेले असताना अनेक आमदार येथे उपस्थित होते, मात्र तेथे देखील खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी दांडी मारल्याचे दिसून आले होते. अनेक कार्यक्रमांमध्ये गैरहजर असणारे खासदार आता इतक्या मोठ्या प्रमाणात युवक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघालेल्या युवा संघर्ष यात्रेमध्ये गैरहजर असल्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नेमके चालले तरी काय आणि त्यांच्या मनात आहे तरी काय असा प्रश्न शिरुर लोकसभा मतदार संघातील नागरिकांना पडला आहे.

    शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी युवा संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होऊ शकलो नसल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.