…तरुणींच्या आईवडिलांची काय घुसमट होत असेल ; अमित ठाकरेंनी व्यक्त केला संताप

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयात एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागणं ही एक अत्यंत संतापजनक घटना आहे.

    “महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयात एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागणं ही एक अत्यंत संतापजनक घटना आहे. ज्या सावित्रीमाईंमुळे भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ झाली, त्यांच्याच नावाच्या हॉस्टेलमध्ये एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा बलात्कार-खून झाल्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. आज हजारो तरुणी आपल्या शहर-गावापासून दूर मुंबई-पुण्यासारख्या शहरात शिक्षण-नोकरीसाठी हॉस्टेलमध्ये राहत आहेत. कालच्या दुर्दैवी घटनेमुळे अशा तरुणींच्या आईवडिलांची काय घुसमट होत असेल, याची कल्पना करवत नाही, असे ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनविसेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी केले आहे.

     

    काय आहे प्रकरण
    मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहात १८ वर्षीय तरुणीची हत्या करून एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीदेवी फुले महिला वसतिगृहातील ही घटना असून, तेथील सुरक्षा रक्षकाने चर्नी रोड स्थानकाजवळ गाडीखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर शहराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

    याघटनेननंतर अमित राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी आता तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिगांभीर्याने घ्यावा आणि राज्यातील सर्व महिला हॉस्टेल्सचे ‘सिक्युरिटी ऑडिट’ करावे, असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.