आईचा प्रियकर घरी येताच मुलगा संतापला; लोखंडी रॉडने वार करून डोकंच फोडलं

एका तरुणाने आईच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याचे डोके फोडले. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी तरुणास अटक केली आहे. निक्की (वय 21) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

    नागपूर : एका तरुणाने आईच्या प्रियकरावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याचे डोके फोडले. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी तरुणास अटक केली आहे. निक्की (वय 21) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. जखमी एकनाथ (वय 44) वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    आरोपी निक्की आणि एकनाथ एकाच वस्तीत राहतात. एकनाथ ई-रिक्षा चालवतो आणि उंटखाना परिसरातील एका खासगी कंपनीत टीम लीडर म्हणून काम करतो. त्याला एक मुलगीही आहे. त्याच्याच कार्यालयात निक्कीची आई ही सुद्धा काम करते. निक्कीच्या वडिलांचे 9 वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हा एकनाथने त्याच्या आईला आधार दिला. 5 वर्षांपूर्वी दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

    पाच महिन्यांपूर्वी एकनाथ आणि महिलेत वाद झाला. तिने एकनाथशी बोलणं बंद केले आणि त्याचा फोन नंबरही ब्लॉक केला होता. तेव्हापासून तिने कामही सोडले होते. घटनेच्या दिवशी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास एकनाथ मुलीला घेऊन महिलेच्या घरी आला. बोलणं बंद करणे आणि नोकरी सोडण्यामागील कारण विचारले. महिलेने त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला आणि घरी जाण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद आणि शिविगाळ सुरू झाली.

    याच दरम्यान निक्की घरी आला. आईशी वाद होत असल्याचे पाहून तो संतापला. खोलीतून लोखंडी रॉड आणत एकनाथच्या डोक्यावर प्रहार केला. एकनाथच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. तो मुलीसह वाठोडा ठाण्यात पोहोचला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये भरती केले. त्याचा जबाब नोंदवून निक्की विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून अटक केली.