अंत्यविधी आटोपून जात असताना काळाचा घाला, ट्रकची धडक अन् दोघांनी गमावला जीव

Nanded Bike Accident : गावातील अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधीला जात होते. पण, त्यांना कुठे माहिती होते की, त्यांच्याच सोबत काहीतरी भीषण घडणार आहे. परंतु, त्यांच्यावर काळाने घाला घातला.

  नांदेड : गावातील एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधीसाठी दुचाकीवरून जात असलेल्या दोघांवर काळाने घाला घातला. ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. भोकर-उमरी मार्गावरील मोघाळी पाटीजवळ हा भीषण अपघात घडला. संजय बाबाराव जाधव (वय ४४) आणि श्यामराव पुंडलिक मिरासे (वय ५५) असं मृतांची नावे आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

  ट्रकने फरफपटत नेत झाला जागीच मृत्यू

  मृतक संजय जाधव आणि श्यामराव मिरासे हे भोकर तालुक्यातील हाडोळी येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी दुपारी दोघेजण गावातील अंत्यविधी आटोपून दुपारी नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे मित्राच्या सासऱ्याच्या अंत्यविधीला दुचाकीने जात होते. भोकर-उमरी मार्गावरून जात असताना हा भीषण अपघात झाला. मोघाळी पाटीजवळ येताच समोरून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की ट्रकच्या धडकेने दोघेजण फरफपटत गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
  घटनेची माहिती मिळताच भोकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, घटनास्थळी धाव घेतलेल्या गावकऱ्यांनी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

  गावावर शोककळा
  मृतक संजय जाधव आणि श्यामराव मिरासे हे दोघे शेतकरी आहेत. या घटनेने हाडोळी गावात शोककळा पसरली आहे. दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने मिरासे आणि जाधव कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, याप्रकरणी भोकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भोकर-उमरी मार्गावर यापूर्वीही अपघाताच्या अनेक घटना घडल्या. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या मार्गावर दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.