शक्य त्याठिकाणी महाविकास आघाडी : जयंत पाटील

नजीकच्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शिवसेना मित्रपक्षांसह महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

    अहमदनगर : नजीकच्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शक्य त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस शिवसेना मित्रपक्षांसह महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांवर भर दिला. काँग्रेससोबत चांगला समनव्य असल्याचे पाटील यांनी सांगितले.

    अहमदनगरमधील राष्ट्रवादी भवनात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक जयंत पाटील यांनी घेतली. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे, संग्राम जगताप, नीलेश लंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, माजी आमदार दादा कळमकर, नरेंद्र घुले, घनश्याम शेलार, कपिल पवार आदी उपस्थित होते.

    निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट
    दसऱ्याला उद्धव ठाकरे मेळावा घेणार आहेत. त्यानंतर जनतेचा रोष कळेल. राज्यातील बंडखोर आमदार व मंत्र्यांच्या मागण्या जास्त आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांत अस्वस्थता आहे. यातच बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन आदित्य ठाकरे सभा घेत आहेत. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरून जनता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. शिंदे गट व भाजप विरोधात जनतेत मोठा रोष आहे. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप पाटील यांनी केला.