महाराष्ट्रातला सहकार कोणी मोडीत काढला ? अमित शाहांचा शरद पवारांना सवाल

सांगली लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते.

  सांगली : महाराष्ट्र म्हणजे सहकराची भूमी होती, मात्र इथला सहकार मोडीत काढण्याचे पाप कोणी केलं ? असा सवाल केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना भर सभेत विचारला. ते विटा येथे सांगली लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, कामगार मंत्री सुरेश खाडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, सुधीर गाडगीळ आदी प्रमुख उपस्थित होते.

  अमित शाह म्हणाले , ” महाराष्ट्रात आशिया खंडातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना होता, तो कोणी बंद पडला ? राज्यात २०२ सहकारी साखर कारखाने होते, त्यापैकी अवघे १०१ शिल्लक राहिले. महाराष्ट्रात ३४ सहकारी जिल्हा बँका होत्या त्यापैकी आता केवळ तीन ते चार शिल्लक राहिल्या आहेत. शरद पवार स्वतः सहकार मंत्री सुद्धा होते, त्यामुळे त्यांनी या सहकारी संस्था कोणी मोडीत काढल्या, याचे उत्तर द्यावे. ” असेही शाह यावेळी म्हणाले.

  भारत देश म्हणजे किराणा दुकान नाही

  अमित शाह म्हणाले, ” इंडिया आघाडीत प्रधानमंत्री पद घेतील अशी एकही व्यक्ती नाही, त्यामुळे ते हे पद अदलून-बदलून वाटून घेतील, हा देश १३० कोटी जनतेचा आहे, आशा प्रकारे प्रधानमंत्री बदलून देश चालणार नाही, भारत देश म्हणजे किराणामलाचे दुकान नाही, मोदी ही एकच व्यक्ती आहे, जी देश सुरक्षित चालवू शकते.” असा दावा त्यांनी यावेळी केला.

  उद्धव ठाकरेंना विचारला सवाल

  यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना नकली शिवसेना म्हणून उद्देशून सवाल उपस्थित केले, ते म्हणाले ” सीएए लागू केला, ३७० कलम हटवले, राम मंदिर बांधले, पीएफआय वर बंदी आणली, हे निर्णय आम्ही घेतले, याबाबत त्यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, मात्र ते याचे उत्तर देणार नाहीत याचा मला विश्वास आहे, कारण त्यांना त्यांचा नवीन मतदार नाराज करायचा नाही, ” असेही शाह यावेळी म्हणाले. अमित शाह यांनी उपस्थित लोकांना आम्ही राम मंदिर, महाकाल मंदिर, केदार धाम, अशी अनेक मंदिरे बांधली आणि सुधारित केली, असं सांगून मतदान देण्याचे आवाहन केलं.