काँग्रेसकडून कोणाला संधी?; पुण्यात लोकसभेसाठी ‘या’ नावांची चर्चा

भाजपने पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानंतर काॅंग्रेसकडून काेण ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.‘ कसब्यात’ जायंट किलर ठरलेले रविंद्र धंगेकर, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश पदाधिकारी माेहन जाेशी यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

  पुणे/महेंद्र बडदे : भाजपने पुण्यात मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानंतर काॅंग्रेसकडून काेण ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.‘ कसब्यात’ जायंट किलर ठरलेले रविंद्र धंगेकर, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश पदाधिकारी माेहन जाेशी यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

  लाेकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात पुणे शहर लाेकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करून भाजपने पहिला डाव टाकला आहे. मात्र आता काँग्रेसकडून कोणता उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या विरोधात उभा टाकणार आहे, याची आता प्रतिक्षा आहे.

  महायुतीच्या वाटपात ही जागा भाजपकडे असल्याने त्यांनी उमेदवारी जाहीर करुन एकप्रकारे प्रचारालाच सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत पुण्याची जागा ही काॅंग्रेसकडे आहे. काॅंग्रेसमध्येही उमेदवारांच्या इच्छुकांची मोठी रांग आहे. त्यात धंगेकर, जोशी आणि शिंदे ही नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. त्यात धंगेकरांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा कसबा मतदार संघ म्हणजेच बालेकिल्ला काबीज केला. त्यामुळे धंगेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

  काम करणारा माणूस अशी ओळख असलेल्या धंगेकरांच्या प्रतिमेचा शहरभर विस्तार करून मतदारांना साकडं घालण्याचा काँग्रेस प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. त्यातच पुणे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत धंगेकरांना मिळालेला पाठिंबा, त्यांची मतदारांमध्ये असलेली क्रेझ पाहून काँग्रेस त्यांना उमेदवारी देऊ शकते. त्यातच सगळ्यात महत्वाचे म्हणजे भाजपला पाडण्याची ताकद असलेला उमेदवारही त्यांना म्हटले जाते.

  कसबा विधानसभेच्या वेळी त्यांची ताकद सर्वांनी पाहिली. मात्र त्यांच्यासोबतच जोशी आणि शिंदे यांचीदेखील नावे चर्चेत आहेत. त्यामुळे काँग्रेस नेमकी कोणाला उमेदवारी देणार, हे पाहणं महत्वाचे आहे. तसेच माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या नावाची चर्चा सध्या सुरु झाली आहे. कदम यांनी २०१४ मध्ये भाजपचे अनिल शिराेळे यांच्याविराेधात निवडणुक लढविली हाेती. तसेच माेहन जाेशी यांनी १९९९ आणि २०१९ मध्ये लाेकसभा निवडणूक लढविली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.

  १९९९ ला त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती. सुरेश कलमाडी यांनी पक्ष साेडला हाेता, त्यामुळे जाेशी यांना उमेदवारी मिळाली हाेती. तेव्हा ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले हाेते. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार विठ्ठल तुपे यांच्यापेक्षा जाेशी यांना जास्त मते मिळाल्याने २००४ मध्ये जागा वाटपात पुणे शहर लाेकसभा मतदारसंघ हा काॅंग्रेसच्या वाट्याला आला.

  जातीचा विचार प्रब‌ळ ठरणार

  पुण्यात उमेदवारी जाहीर करताना भाजपकडून मराठा कार्ड वापरले गेले आहे. यामुळे काॅंग्रेसकडूनही मराठा समाजातून उमेदवार दिला जाऊ शकताे. यामुळे शिंदे आणि कदम यांच्याही नावाचा विचार काॅंग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे.