Bhavesh Bhinde in Ghatkopar Hoarding Fall Case

  Who Is Bhavesh Bhinde in Ghatkopar Hoarding Fall Case : घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेने मुंबई प्रशासनासह राज्यातील प्रशासनसुद्धा खडबडून जागे झाले आहे. आता यामधील मृतांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. परंतु, या सर्व घटनेला जबाबदार असलेला या होर्डींग कंपनीचा मालक भावेश भिंडे अजूनही फरार आहे. आता हा भावेश भिंडे पोलिसांना सापडला नसल्याने भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याला भगोडा घोषित करण्याची मागणी केली आहे. या महाकाय होर्डिंगची निर्मिती करणारा भावेश भिंडे आहे तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत.

   

  घाटकोपरमधील होर्डींगची नोंद लिम्का बुक अॉफ रेकॉर्डमध्ये झाली होती. परंतु, हजारो टनाचे हे होर्डिंग उभारण्याकरिता पायासुद्धा तेवढा मजबूत पाहिजे होता. परंतु, या महाकाय होर्डिंगकरिता अगदी कुचकामी बांधकाम केले गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या होर्डिंगकरिता अगदी किरकोळ बांधकाम करण्यात आले होते. या कुचकामी बांधकामामुळेच हे महाकाय होर्डिंग पडल्याचे समोर आले आहे. यामध्ये निष्पाप 14 नागरिकांचा बळी गेला, 74 जण जखमी झाले.

  पेट्रोल पंपाच्या शेजारी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडेविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. घाटकोपरमध्ये उभारलेल्या महाकाय होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे विरोधात आता पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करावे. त्याचबरोबर त्याला भगोडा घोषित करावे, अशी मागणीसुद्धा किरीट सोमय्या यांनी केली आहे.

  घाटकोपर येथे सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भलेमोठे होर्डिंग (Ghatkopar Hoarding Case) पेट्रोल पंपावर पडले. या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला तर ७४ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पेट्रोल पंपाच्या शेजारी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिंडेविरोधात पंतनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. हा भावेश भिंडे नेमका आहे तरी कोण हे आपण जाणून घेणार आहोत.
  भावेश भिंडेविरोधात गुन्हा दाखल
  भावेश भिंडे हा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मालक आहे. या कंपनीनेच घाटकोपर येथे हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे हा मुलुंड येथे राहतो. होर्डिंग पडल्यानंतर पोलिसांनी भावेश भिंडेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेण्यासाठी मुलुंड येथील त्याचे घर गाठले. परंतु, तो तेथून कुटुंबासहित फरार झाल्याचे समोर आले. त्यामुळे तो पत्ता येथील असला तरीही त्याचे राहण्याचे घर दुसरेच असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांना त्याचा फोन बंद लागत असून तो घरामध्ये नसल्याचे समोर आले. भावेश भिंडे फरार असून पोलिसांची टीम सध्या त्याचा शोध घेत आहे.
  कोण आहे भावेश भिंडे?
  भावेश भिंडे हा गुज्यू अ‍ॅड्स आणि इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवतो. भावेश भिंडेचे वडील रिक्षाचालक होते. भावेशच्या घरची परिस्थिती खूपच हालाखीची होती. त्याने अ‍ॅड एजन्सीमध्ये ऑफिस बॉयचे काम केले होते. पण वडील निधनानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १९९३ मध्ये त्याने होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्याने आपला व्यवसाय वाढवला. त्याला या व्यवसायामध्ये यश देखील आले. त्यामुळे हळूहळू तो एक एक स्टेशन पुढे गेला. त्याने ठाणे, मुलुंड, भांडूप, कुर्ला, कांजूरमार्ग, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, माटुंगा आणि परेलपर्यंत आपला व्यवसाय वाढवला.
  २००९ मध्ये लढवली निवडणूक
  विशेष म्हणजे भावेश भिंडे हा नववी फेल आहे. त्याने आपला व्यवसाय कशाच्या जीवावर वाढवला असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत त्याने या व्यवसायात घोटाळा केल्याचा देखील आरोप केला जात आहे. महत्वाचे म्हणजे भावेशने या व्यवसायाद्वारे प्रसिद्ध मिळवली. त्यानंतर त्याने २००९ मध्ये मुलुंडमधून आमदारकीसाठी विधानसभा निवडणूक लढवली होती. ही निवडणूक त्याने अपक्ष म्हणून लढवली होती.
  भावेश भिंडेविरोधात २१ गुन्हे
  धक्कादायक बाब म्हणजे, त्याने निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात सुमारे २१ गुन्हे असल्याचं नमूद केले होते. त्याच्याविरोधात दाखल करण्यात आलेले २१ गुन्हे हे विनापरवानगी होर्डिंग्स लावल्याबद्दल आहेत. महापालिका कायदा अंतर्गत ३२८ कलमांतर्गत त्याच्यावर २१ गुन्हे हे २००९ पर्यंत दाखल होते. मग हा प्रश्न निर्माण होतो की एवढे गुन्हे दाखल असलेल्या साईन बोर्डच्या मालकाला घाटकोपरमध्ये भलेमोठे होर्डिंग लावण्यास रेल्वे पोलिसांनी परवानगी दिलीच कशी? आता या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले आहे.