नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत आलेले सत्यजीत तांबे आहेत तरी कोण? काय आहे राजकीय वारसा? काय आहेत राजकीय गणितं

विधान परिषदेची संधी काँग्रेसनं दिली होती. त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली होती. मात्र अखेरच्या क्षणी डाव पलटला. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखलच केला नाही. त्याएवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

    नाशिक– नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) हे चर्चेत आले. त्याला आता महिना उलटून गेला आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचं नाव असलेले माजी महसूलमंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे अशीही सत्यजीत तांबे यांची ओळख आहे. तसचं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशीही जबाबदारी त्यांच्याकडं होती. त्यांचे वडील सुधीर तांबे यांना विधान परिषदेची संधी काँग्रेसनं दिली होती. त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली होती. मात्र अखेरच्या क्षणी डाव पलटला. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखलच केला नाही. त्याएवजी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोघांवरही त्यानंतर काँग्रेसनं पक्षातून निलंबनाची कारवाई केली आहे. अहमदनगरच्या राजकारणात होणाऱ्या आगामी बदलांची ही नांदी समजली जातेय.

    सत्यजीत तांबे यांचा राजकीय प्रवास

    सत्यजीत तांबे यांचा राजकीय वारसा मोठा आहे. नगरमधल्या संगमनेरमध्ये त्यांचं प्रस्थ आहे. वडील डॉ. सुधीर तांबे आणि आई दुर्गाबाई तांबे यांच्या पोटी 1983 साली त्यांचा जन्म झालाय. स्वातंत्र्यसैनिक असलेले भाऊसाहेब थोरात हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते. आजोबा स्वातंत्र्यसैनिक, मामा काँग्रेसचे दिग्गज नेते आणि वडील विधान परिषदेचे आमदार असा सत्यजीत यांचा राजकीय वारसा आहे. पुणे विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी सत्यजीत अमेरिकेत गेले. हॉर्वर्ड केनेडी विद्यापीठात त्यांनी राज्यशास्त्र आणि मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेऊन ते मायदेशी परतले. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला.

    सत्यजीत ताांबेंचा राजकीय प्रवास
    2000 – काँग्रेस आणि एनएसयूआयचे सदस्य
    2000 ते 2007- सरचिटणीस, एनएसयूआय, महाराष्ट्र
    2007ते 2017- जिल्हा परिषद सदस्य, एनएसयूआयचे सरचिटणीस
    2011- एनेसयूआयचे उपाध्यक्ष
    2018- एनएसयूआयचे अध्यक्ष
    2023- विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी

    कर्तुत्व सिद्ध करण्याची वेळ?

    वारशानं संधी मिळते, कर्तुत्व सिद्ध करावं लागतं, असं वक्तव्य सत्यजीत ताांबेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर म्हटलं होतं. वयाच्या 40शीतही काँग्रेसकडून संधी मिळत नसल्यानं नाराज असलेल्या सत्यजीत यांनी हे धाडसी पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय. अर्थात याला त्य़ांच्या वडिलांचा आणि मामांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहेच. राज्याच्या बदलत्या राजकारणात लाटेवर स्वार होण्याची संधी त्यांनी घेतल्याचं मानण्यात येतंय. गेल्या काही काळापासून त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वाढलेलं मैत्र, चर्चेचा विषय ठरलं होतं. राज्याच्या राजकारणात प्रभावी असलेल्या नगर जिल्ह्यात आधी विखे पाटील आणि आता तांबेंच्या निमित्तानं थोरात कुटुंबीय भाजपाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आत्ता तरी आपण अपक्ष असल्याचं सत्यजीत सांगत असले तरी त्यांचा पुढचा प्रवास भाजपाच्याच दिशेनं होईल, अशी शक्यता नाकारता येणारी नाही. राजकारणातही पुढच्या काही वर्षांचा विचार करावाच लागतो, असंही राजकीय विश्लेषक सांगतायेत.