“भ्रष्ट पैसा आणि भ्रष्ट पुढारी कुणाला हवेत?…”, भ्रष्टाचारी नेते भाजपात येऊन ‘शुद्ध’ होतात, ‘ईडी’च्या कारवाया फक्त विरोधकांवर; सामनातून तपास यंत्रणा व भाजपावर टिका

केंद्राकडून मेघालयात आलेला हजारो कोटींचा निधी जनतेपर्यंत पोहोचला नाही.' मग तो कोणी हडप केला? यावर मोदी-शहा यांनी संगमांकडे बोट दाखवले, पण त्याच भ्रष्टाचारी संगमांच्या सरकारात आता तेथील तोळामांसा जीव असलेला भाजप निर्लज्जपणे सामील झाला व त्याच 'भ्रष्ट' संगमांच्या शपथविधी सोहोळ्यास पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा खास उपस्थित राहिले.

मुंबई- सत्ताधारी भाजपनेच देशाला भ्रष्टाचाराची वाळवी लावली आहे. गुन्हेगारी स्वरूपाचे व्यवहार करून पैसे जमा करणारे अनेक नेते भाजपात येऊन ‘शुद्ध’ होतात. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप भाजपने केला ते मेघालयाच्या कॉनराड संगमापासून आसामच्या हेमंत बिस्वा सर्मांपर्यंत अनेक लोक भाजपात आले, पण ‘ईडी’च्या कारवाया सुरू आहेत फक्त विरोधकांवर. भ्रष्ट पैसा आणि भ्रष्ट पुढारी कुणाला हवेत? असा प्रश्न आता जनतेलाच पडला असेल. भ्रष्टाचार खणून काढण्याच्या बाबतीत केंद्र सरकार कसे एकांगी पद्धतीने वागते हे आता रोजच दिसत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे ‘ईडी’ व ‘सीबीआय’ आता कायमच्याच बंद व्हाव्यात. भाजप सरकारच्या मनमानीच्या पालखीचे भोई म्हणून या यंत्रणा आता काम करीत आहेत. अशी टिका आज सा्मना वृत्तपत्रातून करण्यात आली आहे.

भ्रष्ट भाजपात गेल्यावर पवित्र कसे?

देशातील नऊ प्रमुख विरोधी नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहून ‘ईडी, सीबीआय’ फक्त विरोधकांनाच कसे ‘लक्ष्य’ करीत आहे ते कळवले. नारायण राणे, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा, प. बंगालचे मुकुल रॉय, सुवेन्दू चौधरी असे अनेक नेते भाजपात प्रवेश करण्यापूर्वी भ्रष्ट होते. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या पुस्तिकाच भाजपने प्रसिद्ध केल्या होत्या, पण हे सर्व लोक आता भाजपात येऊन पवित्र झाले व भाजप त्यांच्याशी सुखाने नांदत आहे. मात्र नऊ विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिताच ‘सीबीआय’ लगेच लालूप्रसाद यादव यांच्या घरी पोहोचली व रेल्वेमंत्री पदाच्या त्यांच्या 2004 ते 2009 या काळातील एका प्रकरणाची चौकशी सुरू केली. श्री. लालू यादव हे सिंगापूरमधून किडनी प्रत्यारोपण शस्त्रीक्रिया करून नुकतेच परत आले आहेत.

‘ईडी’च्या कारवाया फक्त विरोधकांवर

मेघालयातील कॉनराड संगमा यांचे सरकार हे देशातील सगळय़ात भ्रष्ट सरकार असल्याचे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा कालपर्यंत सांगत होते. मेघालयातील विधानसभा निवडणुकांत भाजपच्या प्रचाराचा मुद्दा हा संगमा व त्यांच्या सरकारचा भ्रष्टाचार हाच होता. मोदी व शहा यांनी प्रत्येक प्रचार सभेत सांगितले, ‘संगमा हे भ्रष्ट आहेत व त्यांनी मेघालयाची लूट केली. केंद्राकडून मेघालयात आलेला हजारो कोटींचा निधी जनतेपर्यंत पोहोचला नाही.’ मग तो कोणी हडप केला? यावर मोदी-शहा यांनी संगमांकडे बोट दाखवले, पण त्याच भ्रष्टाचारी संगमांच्या सरकारात आता तेथील तोळामांसा जीव असलेला भाजप निर्लज्जपणे सामील झाला व त्याच ‘भ्रष्ट’ संगमांच्या शपथविधी सोहोळ्यास पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा खास उपस्थित राहिले. संगमा यांच्या घरावर ईडी- सीबीआय पाठविण्याऐवजी मोदी-शहा व भाजप सरळ संगमांच्या सरकारमध्येच सामील झाले व भ्रष्टाचार खणून काढण्यासाठी ईडी- सीबीआयचे पथक पोहोचले ते लालूप्रसाद यादव व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी. सिसोदिया यांना तर अटक करून तुरुंगात पाठवले. असं आज सामनातून म्हणत तपाय यंत्रणा व भाजपावर टिका करण्यात आली आहे.