तीन आमदार कोण होते योग्य वेळ आल्यावर सांगेन : भरत गोगावले

तीन आमदार कोण होते योग्य वेळ आल्यावर सांगेन असे स्पष्ट करतानाच आ भरत गोगावले यांनी दिवशी जे झालं, त्याचा विपर्यास केला गेला असल्याचे सांगितले.

  अलिबाग : तीन आमदार कोण होते योग्य वेळ आल्यावर सांगेन असे स्पष्ट करतानाच आ भरत गोगावले यांनी दिवशी जे झालं, त्याचा विपर्यास केला गेला असल्याचे सांगितले.

  गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या एका विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. भरत गोगावलेंनी मंत्रीपद वाटपावेळी घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. तसेच, यावेळी त्यांनी नारायण राणेंचाही उल्लेख केला होता. या पार्श्वभूमीवर तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना त्यावर भरत गोगावलेंनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

  काय म्हणाले होते भरत गोगावले?
  “आमचे मुख्यमंत्री अडचणीत सापडलेले दिसले आम्हाला. म्हणून मी मंत्रीपदापासून माघार घेतली. मी म्हटलं ठीक आहे. पण काय झालं? एक बोलतो माझी बायको आत्महत्या करेल. एक बोलतो मला नारायण राणे संपवतील. एक बोलतो राजीनामा देईन”, असं भरत गोगावले आपल्या भाषणात म्हणाले होते.

  दरम्यान, शुक्रवारी दुपारी माध्यमांशी बोलताना भरत गोगावलेंनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. “ते परवा सांगून झालं. आता शिळ्या कढीला ऊत देऊ नका.त्या दिवशी जे झालं, त्याचा विपर्यास केला गेला. माझा सहकारी मित्र आहे. आम्ही दोघं सकाळी सोबत होतो. आम्ही एकमेकांचं दु:ख वाटून घेतलं. मुख्यमंत्र्यांनी आमच्यात सहभाग घेतला. आम्हाला समजावलं आणि आम्ही समजलो”, असं गोगावले यावेळी म्हणाले.

  “मी त्या दिवशी म्हणालो एक भाकरी होती. त्याची अर्धी केली, अर्धीची चतकोर केली. आता तेवढ्या भाकरीतही आम्ही वाटून घेऊ. पण एकच सांगतो, आमच्याकडून चुकीचं कधी काही जाणार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांबद्दल तर नाहीच नाही”, असंही गोगावले यांनी नमूद केलं. दरम्यान, “तीन आमदार कोण होते योग्य वेळ आल्यावर सांगेन”, असंही भरत गोगावले म्हणाले.

  “नाराज असतो तर इथे आलो नसतो”
  दरम्यान, मंत्रीमंडळ विस्तारावर नाराज असल्याची चर्चा असताना त्यावरही गोगावलेंनी उत्तर दिलं आहे. “आता जो होईल तो विस्तार व्यवस्थित होईल. काही कारणास्तव तो थांबला आहे. माझ्या नाराजीच्या चर्चा आहेत. पण तसं काहीही नाहीये. आम्ही नाराज असतो तर मंत्रालयात आलोच नसतो. ठीक आहे. सबुरीचं फळ गोड असतं”, असंही गोगावलेंनी नमूद केलं.