वसंतदादा घराण्याचे ‘कमबॅक’ की पुन्हा भाजप? सांगली लोकसभा निवडणुकीत कोण ठरणार वरचढ?; काँग्रेसचा उमेदवार निश्चित तर भाजपकडून चाचपणी

सांगली लोकसभा मतदारसंघावर सुमारे चाळीस वर्षे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील घराण्याची सत्ता राहिली आहे. मात्र, २०१४ च्या निवडणुकीनंतर याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का देत भाजपचे संजयकाका पाटील यांनी 'कमळ' फुलवले.

  सांगली / प्रवीण शिंदे : सांगली लोकसभा मतदारसंघावर सुमारे चाळीस वर्षे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील घराण्याची सत्ता राहिली आहे. मात्र, २०१४ च्या निवडणुकीनंतर याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला धक्का देत भाजपचे संजयकाका पाटील यांनी ‘कमळ’ फुलवले. आता यंदा २०२४ च्या निवडणुकीत वसंतदादा पाटील यांचे नातू काँग्रेसचे विशाल पाटील यांनी पुन्हा लोकसभेसाठी कंबर कसली आहे.

  सांगली जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा जिल्हा म्हणून राज्यभर ओळख, पहिल्या लोकसभा निवडणुकीत शेकापचे बळवंत पाटील निवडून आले होते, आणि त्यानंतर १९६२ पासून सन २०१४ पर्यंत सांगली लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. सुमारे 40 वर्ष हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता, अर्थात यापैकी १९८० मध्ये वसंतदादा स्वतः खासदार झाले तिथून पुढे सुमारे चाळीस वर्षे खासदारकी फक्त वसंतदादा घरात राहिलेली होती.

  मोदी लाटेत काँग्रेसचा बालेकिल्ला पडला

  २०१४ मध्ये काँग्रेसचा हा बालेकिल्ला मोदी नावाच्या लाटेने उधवस्थ केला. मोदी नावाचा वारू देशभर फिरला, सांगलीतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले, यावेळी सुद्धा वसंतदादांच्या घरात प्रतिक पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, जे स्वतः त्यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री होते. मात्र तरी देखील संजयकाका पाटील यांनी ६ लाख ११ हजार मते पडली होती. त्याचवेळी प्रतीक पाटील यांना त्यापैकी निम्मी मते पडली होती.

  ‘वंचित’ पॅटर्नने भाजपला तारले…

  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा वसंतदादा घराण्यातील व्यक्तीने काँग्रेस सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली, मात्र त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर मैदानात उतरले, पडळकर यांना काँग्रेसवर नाराज, मुस्लिम, धनगर आणि दलित मतांचा तीन लाख गठ्ठा मिळाला, त्यामुळे वंचित पॅटर्न यशस्वी झाला, आणि संजयकाका पाटील यांना पुन्हा लोकसभेची लॉटरी लागली.

  वसंतदादा, प्रकाशबापू, प्रतिक पाटील यांच्या नंतर आता २०२४ च्या निवडणुकीत विशाल पाटील लोकसभा लढवण्यासाठी कंबर कसली आहे. विशाल पाटील हे वसंतदादांचे नातू आहेत. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते संचालक आहेत. ते आक्रमक असले तरी केवळ निवडणुका आल्यानंतरच ते कामाला लागतात, असा आरोप त्यांच्यावर होत असतो.

  विशाल पाटील यांच्यासमोर ही आहेत आव्हाने

  विशाल पाटील यांचा लोकसंपर्काचा अभाव आहे, महविकास आघाडीतील जयंत पाटील, विश्वजीत कदम, विक्रम सावंत, अरुण लाड यांच्याकडून पूर्ण ताकतीने मदत मिळायला हवी, गतवेळी प्रमाणे मत विभाजन होऊ शकते.

  काकांच्या पुढे ही आव्हाने

  संजयकाका पाटील यांचा लोकसंपर्क ही एकमेव जमेची बाजू असली तरी आता सलग दहा वर्षे खासदार असल्याने नाराजी आहे. महायुतीच्या अनेक नेत्यांशी निवडणुकीनंतर संबंध ताणले गेले, भाजपकडून उमेदवारी जाहीर करायला लावलेला वेळ, शेती विरोधी केंद्राची धोरणे अशा अडचणी आहेत.

  आजपर्यंत सांगली लोकसभेला निवडून आलेले उमेदवार

  १९६३ – विजयराव डफळे
  १९६७ – एस.डी.पाटील
  १९७१ – गणपती गोटखिंडे
  १९८० – वसंतदादा पाटील
  १९८३ – शालिनीताई पाटील
  १९८४ – प्रकाशबापू पाटील
  १९९६ – मदनभाऊ पाटील
  १९९९- प्रकाशबापू पाटील
  २००६ – प्रतिक पाटील
  २००९ – प्रतिक पाटील
  २०१४ – संजयकाका पाटील
  २०१९ – संजयकाका पाटील

  भाजपचे इतरही पर्याय चर्चेत

  काँग्रेसकडून विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असली तरी भाजपकडून मात्र अद्याप पर्याय शोधला जात आहे. यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले संग्राम देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे, कारण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना सर्वांशी चांगले संबंध, देशात प्रथम क्रमांकावर जिल्हा परिषद आणल्याने केंद्राच्या गुड बुक मध्ये आहेत. त्यामुळे भाजपकडून संग्राम देशमुख हा पत्ता देखील खेळला जाऊ शकतो.

  यापूर्वीही काँग्रेसने वादळात फडकावला झेंडा

  शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर सांगली लोकसभेची जागा संकटात आली होती. त्यावेळी सांगलीची जागा जाणार अशी सर्वत्र चर्चा होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी छोटासा मेळावा बोलावला होता, मेळाव्यात स्वतः भोसले, शिवाजीराव देशमुख, डॉ.पतंगराव कदम होते.

  लोक येणार नाहीत म्हणून छोट्या घेतलेल्या मेळाव्याला हजारो लोक आले. गर्दी बघून प्रदेशाध्यक्ष भोसलेंचा आत्मविश्वास वाढला आणि त्याच मेळाव्यात त्यांनी जाहीर केलं की ” प्रकाशबापू पाटील यांना जर कोणी पाडलं तर मी त्या विजेत्याच्या घरात पाणी भरायला राहीन”, आणि या निवडणुकीत प्रकाशबापू पाटील प्रचंड मतांनी निवडून आले होते.