Solapur ZP
Solapur ZP

    शेखर गोतसुर्वे/सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असलेल्या उपक्रमातील छपाईच्या निविदा विभाग प्रमुखांची जबाबदारी असताना आरसीएच समन्वयक फाइली फिरवीत असल्याचे दिसून आल्याने संशय वाढला आहे.

    छपाईचे टेंडर लातूरच्या ममता जाहिरात एजन्सीला

    जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील विविध उपक्रमांच्या छपाईचे टेंडर लातूरच्या ममता जाहिरात एजन्सीला मंजूर केले आहे. या ऑनलाइन निविदांमध्ये 17 संस्थांनी भाग घेतल्याचा दावा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक वैशाली थोरात यांनी केला आहे.

    जि.प. सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याकडे तक्रार

    समितीने नियमाप्रमाणेच ही निविदा मंजूर केली असे त्यांचे म्हणणे आहे. ज्यावेळी या निविदांबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली त्यावेळी आव्हाळे यांनी या फाइलीची तपासणी केली. छोट्या कामासाठी आता तुम्ही लातूरला जाणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर प्रकरण अंगलट येत आहे, असे पाहून या प्रकरणाशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांचे धावपळ सुरू झाली.

    एकदा मंजूर झालेली निविदा रद्द करणे महागात

    या कर्मचाऱ्यांनी मुख्य लेखा व्यवस्थापकाचा अभिप्राय घेऊन एकदा मंजूर झालेली निविदा रद्द करणे महागात पडेल, अशी भीती सीईओंना घातल्याची जिल्हा परिषदेत चर्चा रंगली आहे. सीईओंनी या निविदांबाबत विचारणा केल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांची भंबेरी उडाली. पण, त्याचा खुलासा कर्मचाऱ्यांनी केल्याची चर्चा आहे. मग या फाईलीमध्ये इंटरेस्ट कोणाचा? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    आरसीएच समन्वयक म्हणून जबाबदारी

    त्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे आरसीएच समन्वयक म्हणून जबाबदारी आहे त्या कर्मचाऱ्याने टेंडरची ही फाईल हाताळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. नवले यांनी ही जबाबदारी ‘त्या” कर्मचाऱ्यावर कशासाठी दिली? यामागे कोणाचा ‘हात” आहे? याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.

    वरिष्ठांची केली बदनामी…

    सीईओ आव्हाळे यांनी या प्रकरणाची चौकशी लावल्यावर आरोग्य विभागाने मोठी खेळी केली असल्याची चर्चा आहे चक्क वरिष्ठ पैसे घेतल्याची जाणीवपूर्वक चर्चा पसरवण्यात आली. यामुळे वरिष्ठांची बदनामी झाली. त्यामुळे ही चौकशी दाबली गेली, अशी चर्चा आता झेडपीत रंगली आहे. वरिष्ठांची बदनामी जाणीवपूर्वक कोणी केली? याचा आता शोध घेणे गरजेचे झाले आहे.