काहीही करा, कसंही करा! पण…शिवसेना कुणाची? दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची व्यूहरचना

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या बैठकीला मार्गदर्शन करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेला साजेल असा हा मेळावा साजरा होणार असल्याचे सांगितले. संपूर्ण देशाचे लक्ष या मेळाव्याकडे असून आम्हाला शक्तीप्रदर्शनाची आवश्यकता नाही.

  मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

  शिवसेना (ShivSena) कुणाची हा निर्णय न्यायालयात लागण्याआधीच दसऱ्याला  लागेल. संपूर्ण देशाचे लक्ष दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava 2022) लागले असून शक्तीप्रदर्शनाची आवश्यकता नाही. हिंदुत्वाचा (Hindutva) विचार मानणारे पाहुणे आले तर त्यांचे स्वागत करु. मात्र, हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतलेल्यांना स्थान नाही, असा निर्धार शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

  शिवसेना आणि शिंदे गट (Eknath Sinde Group) यांच्यामध्ये शिवतीर्थावर (Shivtirtha) दसरा मेळावा घेण्यावरून वाद निर्माण झाला होता. कोर्टात जाऊन पोहोचलेल्या या वादावर न्यायालयाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने निकाल देत शिवाजीपार्क मैदानावर (Shivaji Park) दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकाही बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार असून बुधवारी सायंकाळी शिंदे गटाचे नेते, मंत्री, प्रवक्ते यांची महत्वाची बैठक ओबेरॉय हॉटेलमध्ये झाली.

  शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या बैठकीला मार्गदर्शन करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेला साजेल असा हा मेळावा साजरा होणार असल्याचे सांगितले. संपूर्ण देशाचे लक्ष या मेळाव्याकडे असून आम्हाला शक्तीप्रदर्शनाची आवश्यकता नाही. येथे येणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने केले जाणार आहे. शिवसेना कुणाची हा वाद न्यायालयात असला तरी तेथे निर्णय लागण्याआधीच याचा निकाल दसऱ्याला लागेल, असा विश्वास व्यक्त केला.

  शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दसरा मेळावा उत्साहातच होईल. विचारांचं सोनं लुटण्याकरता निवडलेला हा दिवस आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shide) हे बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांवर चालत आहेत. हिंदुत्वाचा विचार मानणारे पाहुणे आले तर त्यांचे स्वागत करु. मात्र, हिंदुत्वाच्या विचारांशी फारकत घेतलेल्यांना स्थान नाही. तसेच, इतर पक्षांच्या नेत्यांना बोलवण्याचे कोणतेही नियोजन नाही, असे स्पष्ट केले.

  सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेला निकाल हा आपल्यातला उत्साह वाढवणारा आहे. या निकालामुळे अनेकांचे धाबे दणालले आहेत. आपल्यासोबत येण्यास अनेकजण इच्छुक असून त्याचे प्रवेश दसरा मेळाव्याला होतील. साधारणतः अडीच ते तीन लाख लोक येण्याची शक्यता असून गाड्यांसाठी आसपासची दहा मैदाने बुक केली आहेत. जे कार्यकर्ते येतील त्यांची जेवणाची, पाण्याची आणि वॅाशरुमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे केसरकर यांनी सांगितले.

  भाड्याने आणलेल्याना आमच्यावर सोडले जातंय

  उद्धव ठाकरे यांच्यात ताकद असती तर ५० आमदार आणि खासदार त्यांना सोडून गेले नसते. आमच्यावर टीका करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीमधून माणसे आणावी लागतात. राष्ट्रवादीतून भाड्याने आलेल्यांना नेते – उपनेते करुन आमच्या अंगावर सोडले जात आहे. भास्कर जाधव सारखा माणूस बाटगा असून त्याला कुत्रा चावलाय अशी बोचरी टीका रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनेवर केली.