सगळ्यांना पाडता तर तुमच्या मुलाला का निवडून नाही आणलं? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना खोचक सवाल

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत.

    ठाणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अजित पवार यांनी शरद पवार गटातील अनेक उमेदवारांना धमकीवजा इशारा दिले आहेत. निलेश लंके व अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत. तसेच तुम्ही सगळ्यांना पाडणार म्हणता तर तुमच्या मुलाला का नाही निवडणून आणलं असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे.

    एवढा माज कसला दाखवता?

    जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवार आता सगळ्यांना डोस देत सुटलेत, तुला पाडीन – तुला पाडीन करत आहेत, मग तुम्हाला तुमच्या पोराला निवडून का आणला नाही? लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता? ज्या बापाने मला घडवलं, त्या बापाचा हात सोडताना हृदयात जराही कालवाकालव झाली नाही? अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

    जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, 1991 साली अजित पवारांना महाराष्ट्रात कोण ओळखतं होतं? त्या अजित पवारांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि संसदेत पाठवलं. त्यानंतर वारंवारं सत्तेच्या वर्तुळात ठेवलं, ४ वेळा उपमुख्यमंत्री बनवलं. संघटनेचे पद का घेतले नाही, कधीतरी मला पक्षाचे अध्यक्ष करा, मला पक्ष वाढवायचाय असं का म्हटलं नाही. तुम्हाला केवळ सत्ता हवी होती. त्या सत्तेसाठी तुम्ही शरद पवारांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि पक्ष स्वतः ताब्यात घेतला असा घणाघाती आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

    दोन्ही गद्दाऱ्या महाराष्ट्राला कधीही आवडणार नाहीत

    जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या मातोश्रीने आईसारखं प्रेम दिलं, आपलेपणा दाखवला ती मातोश्री फोडण्याचंच काम केलं. या दोन्ही गद्दाऱ्या या महाराष्ट्राला कधीही आवडणार नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहास दोन गद्दारी ओळखल्या जातात. खंडोजी खोपडे आणि सुर्याजी पिसाळ. यांच्या अवलादींना महाराष्ट्राने कधीही ओळख दिली नाही. त्यामुळे येत्या निवडणुकीत खंडोजी खोपडे आणि सूर्याडी पिसाळ या गद्दार लोकांना कायमचं संपवू टाका, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.