bachchu kadu

भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी (ED Inquiry) का होत नाही, असा खोचक सवाल प्रहार संघटनेचे जनशक्ती आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते, असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे.

    मुंबई : भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी (ED Inquiry) का होत नाही, असा खोचक सवाल प्रहार संघटनेचे जनशक्ती आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून फक्त विरोधी पक्षातील नेत्यांची चौकशी केली जाते, असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. यावरून बच्चू कडू यांनी थेट भाजपला सवाल विचारला आहे.

    भाजपच्या एकाही नेत्याची ईडीकडून का चौकशी केली जात नाही? याचे उत्तर भाजपने द्यायला पाहिजे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. मराठा आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना प्रसारमाध्यमांना उद्देशून बच्चू कडू म्हणाले, समाजाला हुशार करण्याची जबाबदारी राजकीय नेत्यांची असते. पण राजकीय नेते चुकले तर प्रसारमाध्यमांनी त्यांनी ताळ्यावर आणले पाहिजे. जे काही सत्य आहे, ते तुम्ही मांडले पाहिजे. यामुळे राजकीय नेते रुसले तर तुमचे काहीच बरे-वाईट होत नाही. तुमच्यामागे ईडीची चौकशीही लागू शकत नाही, अशाप्रकारे काम करत राहा, असा सल्ला त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला.

    भाजपने उत्तर दिले पाहिजे

    बच्चू कडू पुढे म्हणाले की, मी तर आता भाजपबरोबर आहे. पण भाजपवाल्यांना माझा प्रश्न आहे. माझा सरळ प्रश्न आहे, ईडीने भाजपच्या एकाही नेत्याची चौकशी का केली नाही? त्यांनी याचे उत्तर द्यायला पाहिजे. एका सामान्य कार्यकर्त्यालाही हा प्रश्न पडतो, असे कडू म्हणाले.