
आज मराठा समाजाची अवस्था बघताय ना, खासदार, आमदार मोजके लोक आहेत. मराठा समाजाची परिस्थिती बघा. लोक भांगलायला जातात. आर्थिक दुर्बल आहेत. जे लोक मराठा समाजाचे राजकारण करतात. त्यांनी इतके वर्ष का आरक्षण दिले नाही.
सातारा : आज मराठा समाजाची अवस्था बघताय ना, खासदार, आमदार मोजके लोक आहेत. मराठा समाजाची परिस्थिती बघा. लोक भांगलायला जातात. आर्थिक दुर्बल आहेत. जे लोक मराठा समाजाचे राजकारण करतात. त्यांनी इतके वर्ष का आरक्षण दिले नाही. स्वत: आरशासमोर उभं रहावे आणि स्वत:ला प्रश्न विचारावा, असा खरपूस समाचार मराठा समाजाच्या नेते मंडळींचा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात योग्य बाजू कोर्टात मांडली असती तर आरक्षण टिकले असते, अशी भावना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
खासदार उदयनराजे म्हणाले, माझे मित्र आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई मला भेटायला आले. तसे आम्ही नेहमी भेटत असतो. परंतु खास करुन जालना जिल्ह्यात जी काय घटना घडली आहे. ती आपण सगळ्यांनी पाहीली आहे. त्या प्रकरणात न्यायालयीन चौकशीची आम्ही मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांची पण तिच भूमिका आहे. मात्र, कारण नसताना आज आरक्षणाचा जो मुद्दा आहे. त्याच राजकारण कोणी करु नये. जे लोक राजकारण करण्यात वेळ घालवतात. सर्वांनी एकत्र येवून आरक्षण कसे मिळेल, या हिशोबाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. वास्तविक आता जे लोक आरक्षणबाबत सांगत आहेत, जे आरक्षणाच्या बाबतीत गैरसमज पसरवले जात आहेत ते त्यांनी त्वरीत थांबवावे. जेव्हा एवढी वर्ष सत्तेत असताना कुठलेही लिड त्यांनी आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतले नाही. कुठलेही पाऊल उचलले गेले नाही, अशा शब्दात त्यांनी मराठा राजकारण करणाऱ्यांवर टीका केली.
उदयनराजे भोसले म्हणाले, समाजातले वेगवेगळे घटक आहेत. प्रत्येकाला न्याय मिळालेला आहे. त्याच धर्तीवर मराठा समाजाला न्याय मिळणे गरजेचे आहे. पालकमंत्री शंभूराज देसाईंनी जे सांगितले की, न्यायालयीन ज्या त्रुटी आहेत, त्या पूर्ण करुन मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे सगळे मिळून प्रयत्न करु. खरे तर पहायला गेले तर आता जे लोक बोलतात. मला कोणाचं नाव घेवून त्यांना मोठं करायचे नाही. त्यांच्या दुर्लक्षपणामुळे आज सुप्रिम कोर्टात आरक्षण टिकले नाही. ज्या प्रकारे चर्चा व्हायला पाहिजे होती. त्यावर काम व्हायला पाहिजे होते. तसे झाले नाही. त्यामुळे आरक्षण टिकले नाही. याचे राजकारण कोणी करु नये. जे राजकारण करतात. त्यांनी स्वत: आरशासमोर उभे रहावे आणि स्वत:लाच प्रश्न विचारावा. एवढे वर्षे आपण का केले नाही, अशा शब्दांत त्यांनी फटकारले.
चर्चेतून प्रश्न सुटेल
उदयनराजे म्हणाले, कोर्टात त्यावेळी महाविकास आघाडीने किंवा त्यांची सत्ता होती. त्यांनी लक्ष का दिले नाही. खासदार, आमदार, किती मोजके आहेत. बाकी समाजाची अवस्था काय आहे. द्रारिद्रय रेषेखाली जी लोक रहातात. त्यांचा विचार केला गेला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मग कुठल्याही जातीतला असू द्या. त्याला सोयी लागू केल्या पाहिजेत. त्या केलेल्या नाहीत. सगळ्यांनी शांततेत घेतले पाहिजे. कोणाला दुखापत होता कामा नये आणि चर्चेतून आणि कोर्टाच्या माध्यमातून निश्चीतपणे प्रश्न सुटेल, असे त्यांनी सांगितले.
समाजाला न्याय मिळाला पाहिजे
उदयनराजे भोसले म्हणाले, आंदोलनकर्त्यांची जी भावना आहे. तिच लोकांची भावना आहे. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. यात गैर काही नाही. कोण काय म्हणत असेल त्यावर मला फारसं भाष करायचे नाही. कारण प्रत्येकजण इलेक्शनच्या हिशोबाने प्रेरीत होवून मांडणी करणार आहे, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.