ढेपे, बाणूर यांची चौकशी करणार; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांची माहिती

  सोलापूर : प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाचे तत्कालीन अधीक्षक विठ्ठल ढेपे व माध्यमिक शिक्षण विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले लिपिक संजय बाणूर यांची चौकशी करणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली.

  झेडपीच्या प्रवेशद्वारावर उपोषण

  शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे, कार्याध्यक्ष शशिकांत पाटील, करमाळा तालुकाध्यक्ष विजयकुमार गुंड तर शिक्षक मायप्पा हाके, यास्मीन अन्सारी, शरद पवार, नौशाद सय्यद यांच्यासह अन्य शिक्षक, शिक्षक दिनापासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले होते.

  17 मागण्यांचे निवेदन प्रशासनाला

  जिल्हा परिषद प्रशासनाला माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील अडचणीबाबत 17 मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले होते. प्रशासनाने दखल न घेतल्याने आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. या उपोषणाला माजी आमदार दिलीप माने व इतर संघटनांनी पाठींबा दिला होता. शुक्रवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झेडपी शिक्षकांचा सन्मान तर दुसरीकडे उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची अवेहेलना होत असल्याबात लक्ष वेधण्यात आल्यावर प्रशासन जागे झाले. शिक्षक भारतीचे प्रदेशाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्यासह उपोषणकर्त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर यांनी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले.

  शिक्षण विभागातील भ्रष्टचाराचा भांडाफोड

  त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिक्षक भरती करमाळा तालुक्याचे अध्यक्ष विजयकुमार गुंड यांनी शिक्षण विभागातील भ्रष्टचाराचा भांडाफोड केला. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे अधीक्षक म्हणून अतिरिक्त कारभार पाहिलेले विठ्ठल ढेपे यांनी भावाच्या मध्यस्थीने बाजार मांडल्याचा आरोप केला. करमाळ्याच्या एका संस्थेकडून वेतनाचे सव्वा कोटी काढून देण्यासाठी मोठी रक्कम उकळली.

  लिपिक संजय बाणूर यांच्याकडून पैशांची मागणी

  यापूर्वी त्यांच्यावर लाचलुचपतची कारवाई झाली आहे. असे असतानाही मनपाच्या शिक्षण मंडळाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. माध्यमिक शिक्षण विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले लिपिक संजय बाणूर यांनी उपोषणाला बसलेल्या शिक्षकांच्या फायली जाणीवपूर्वक अडवून पैशाची मागणी केली. या भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही प्रशासनाला देण्यास तयार आहोत, असे गुंड यांनी सांगितले. गुंड यांच्या आरोपाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी अधिकार्‍यांशी बैठक घेवून शिक्षकांचे आंदोलन मिटविण्याच्या सूचना दिल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर यांनी यात महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी लेखी आश्‍वासन दिल्यावर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले.

  काका साठे यांनी वेधले होते लक्ष

  माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार सुधारायचा असेल तर संजय बाणूर यांची माळशिरला बदली करा अशी सूचना झेडपीचे माजी अध्यक्ष काका साठे यांनी प्रशासनाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांना केली होती. त्यानंतर शिक्षक दिनापासून शिक्षक भारतीने बाणूर व अधीक्षक ढेपे यांच्याविरूद्ध आंदोलन सुरू केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले आहे.

  बाणूर आहेत रजेवर…
  माध्यमिक शिक्षण विभागातून प्रतिनिधी रद्द झाल्यावर बानुर प्राथमिकला हजर झाले आहेत. त्यानंतर त्यांनी दीर्घ रजा काढली असल्याचे शिक्षण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले.