राज्यात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, श्रीलंकेसारखी अवस्था भारतात होऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे – संजय राऊत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्या धमकीवरुन आता विविध राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. धमकीवरून आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही ठाकरे आहात, एवढे महाराष्ट्रात राहता घाबरण्याचे कारण नाही. राज्यात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही,  असं म्हणत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

    मुंबई : बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेत सुरक्षेची मागणी केली आहे. मात्र यावरुन आता विविध राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. धमकीवरून आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही ठाकरे आहात, एवढे महाराष्ट्रात राहता घाबरण्याचे कारण नाही. राज्यात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही,  असं म्हणत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

    दरम्यान, शिवसेना भवनात अशी पत्रं शेकड्याने येत असतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. लागणार असेल तर केंद्र सरकार CISF च्या जवानांची सुरक्षा द्यायला समर्थ आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला. तुम्ही इतकी वर्षे महाराष्ट्रात राहत आहात, तुमच्या नावात ठाकरे आहे. तुम्हाला हात लावण्याची हिंमत कोणीही करणार नाही. किंबहुना महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला हात लावण्याची हिंमत कोणीही करणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. त्यामुळे स्टंटबाजी बंद करा, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना आलेल्या धमकीनंतर दिली आहे.

    वाढती महागाई व अर्थव्यवस्था यावर सुद्धा राऊत यांनी भाष्य केले. जीवनावश्यक वस्तू तसेच इंधनाचे दररोज वाढणारे दर यामुळं जनता मेटाकुटीला आली आहे. यावर वेळीच केंद्र सरकारने आवर घातला पाहिजे. तसेच महागाई थांबवली पाहिजे नाहीतर आपली अर्थव्यवस्था डबघाईला जाईल. तसेच श्रीलंकेसारखी अवस्था भारतात होऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे असं म्हणत  संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टिका केली.