‘कांदा उत्पादकांचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार’; मंत्री छगन भुजबळ यांचे आश्वासन

शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्यास हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा, त्याचप्रमाणे कांदा उत्पादक (Onion Producer Farmers) शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

    नाशिक : शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्यास हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा, त्याचप्रमाणे कांदा उत्पादक (Onion Producer Farmers) शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

    लासलगाव कृषी उत्पन्न बाजारच्या विंचूर उपबाजार समितीस दिलेल्या भेटी दरम्यान ते बोलत होते. यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे, संचालक जयदत्त होळकर, पंढरीनाथ थोरे अनेकांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे कांद्याचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे कांद्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी शासन स्तरावर शेतकरी प्रतिनिधी, कांदा व्यापारी, बाजार समित्यांचे पदाधिकारी यांची बैठक घेणार असून, यात सर्वांच्या समस्या जाणून घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

    दोन टप्प्यात खात्यावर अनुदान

    कांद्यास अनुदान मिळण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरवा केला असून, कांद्यासाठी 350 रूपये प्रति क्विंटल अनुदान राज्य शासनाने यापूर्वीच मंजूर केले आहे. यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 865 कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून, ते दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

    435 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार

    यापैकी 465 कोटी अनुदान वितरीत करण्यास शासनाने नुकतीच मंजूरीही दिली आहे. यात 60 टक्के शेतकरी हे नाशिक जिल्ह्यातील असून, 435 कोटी रूपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होणार असल्याची माहितीही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.