बोंडारवाडी धरणासाठी उपमुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण बांधण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. 

    पाचगणी : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी (Bondarwadi Dam) येथे धरण बांधण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

    अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जलसंपदामंत्री जयंत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर आदी उपस्थित होते.

    सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रस्तावित आहे. जावळी तालुक्यातील गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे हे धरण लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे, असा सूर आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठकीत आवळला. डॉ. भारत पाटणकर यांनी ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी धरण आवश्यक असल्याचे नमूद केले.

    यावर धरणाच्या पूर्ततेसाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने आवश्यक कार्यवाही करावी. धरणासाठी आवश्यक असणारे सर्व्हेक्षण करुन घ्यावे. सर्व्हेक्षणासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.

    जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यावर जलसंपदा विभागाने धरणाचे सर्व्हेक्षण, अन्वेषण आणि संकल्पन याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केल्या.