जात वैधतेचा प्रश्न विधानसभेत मांडणार; आमदार राहूल कुल यांचे आश्वासन

विद्यार्थ्यांच्या जात वैधतेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला जाईल, अशी ग्वाही दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

    देऊळगाव राजे : विद्यार्थ्यांच्या जात वैधतेचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला जाईल, अशी ग्वाही दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिली. या पदाधिकाऱ्यांनी कुल यांची भेट घेत त्यांना विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. त्यावेळी हा विषय विधानसभेत मांडणार असल्याचे कुल यांनी त्यांना सांगितले.

    यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत ,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे व पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण हे पदाधिकारी उपस्थित होते. अधिक माहिती देताना महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून राज्य शासनाने जिल्हास्तरीय जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यालये सुरु केली आहेत. मात्र, जात वैधता प्रमाणपत्रे सहजासहजी मिळत नाहीत. उल्लेखनीय बाब म्हणजे घरात एखाद्याचे जातीचे वैधता प्रमाणपत्र असून सुद्धा कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तींना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवताना पुन्हा एकदा चौकशीचे कारण पुढे करून अडवणूक केली जात आहे.

    राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने एका दिवसात जात प्रमाणपत्र दिले जातील, असे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात कित्येक कार्यालयात एका दिवसात साधा अर्जही स्वीकारला जात नाही. जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे दूरच राहिले. त्यामुळे शासनाच्या या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या बेरोजगारांचे नुकसान होत आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू

    विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र शिक्षण घेत असताना शाळेतच देण्यात यावे. जात प्रमाणपत्र देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सर्व सामाजिक संघटना व पालकांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू, असा इशारा कांबळे यांनी दिला. या निवेदनाची प्रत बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनाही देण्यात आली आहे.