प्रशासन उद्यानांची नावे बदलणार का ? 

महापालिकेच्या 70 उद्यानांना दिलेली नगरसेवकांच्या नातेवाइकांची नावे मुख्य सभेने 2000 साली केलेल्या ठरावाच्या विरोधात असल्याचा अभिप्राय विधी विभागाने दिला आहे.

    पुणे : महापालिकेच्या 70 उद्यानांना दिलेली नगरसेवकांच्या नातेवाइकांची नावे मुख्य सभेने 2000 साली केलेल्या ठरावाच्या विरोधात असल्याचा अभिप्राय विधी विभागाने दिला आहे.
    या अभिप्रायामुळे अधिकार्‍यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे. आता प्रशासन या उद्यानांची नावे बदलणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरातील नागरिकांसाठी महापालिकेच्या निधीतून शहरात विविध ठिकाणी उद्याने साकारली जातात. ही उद्याने नगरसेवकांच्या निधीसह मालमत्ता आणि उद्यान विभागाकडून उभारली जातात.
    मालमत्ता किंवा नगरसेवकांच्या निधीतून साकारलेल्या उद्यानांची सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर उद्यान विभागाच्या ताब्यात दिली जातात. या उद्यानांना नावे देण्याचा प्रस्ताव नाव समितीद्वारे मुख्य सभेत मंजूर केला जातो. त्यानंतर उद्यानांना नावे दिली जातात. महापालिकेच्या उद्यानांना पर्यावरण, वनस्पती तज्ज्ञ आणि ज्येष्ठ राष्ट्रीय नेत्यांची नावे देण्याचा ठराव महापालिकेच्या मुख्य सभेने 2000 साली एकमताने मंजूर केला आहे. मात्र, गेल्या वीस वर्षांत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या 210 उद्यानांपैकी 70 उद्यानांना आपल्या नातेवाइकांची नावे दिल्याचे उजेडात आले आहे. नातेवाइकांची नावे देण्यावरून नागरिकांमधून टीका होत आहे.
    नागरिकांची आंदोलने होत आहेत, या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी उद्यान विभाग आणि नगरसचिव विभागाकडून याबाबत माहिती मागविली होती. तसेच याबाबत विधी विभागाकडून अभिप्राय मागविला होता. उद्यानांना देण्यात आलेली नातेवाइकांची नावे मुख्य सभेच्या 24 जुलै 2000 च्या ठरावाला डावलून दिल्याचा अभिप्राय विधी विभागाने दिला आहे. त्यामुळे महापालिका अधिकार्‍यांसमोर पेच निर्माण झाला असून प्रशासन आता या उद्यानांची नावे बदलणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.