नवराष्ट्र स्पेशल! राज्यपाल खरंच जाणार की फक्त हूलच? भाजपा धुरिणांच्या मनात नेमकं काय चाललंय? जाणून घ्या तीन महत्त्वाच्या शक्यता…

राज्यपालांनी आपणाला राज्यपालाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. तशा प्रकारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले. त्यामुळं राज्यपाल खरोखरंच जाणार का? की फक्त ही भाजपाची (BJP) हूल आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. पाहूया तीन महत्त्वाच्या शक्यता...

  मुंबई- महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी जेव्हापासून राज्यपालपदाचा पदभार स्विकारला आहे, तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सतत चर्चेत आहेत. मागील काही दिवसांपासून महापुरुषांबाबत वादग्रस्त, आक्षेपार्ह वक्तव्यामुळं कोश्यारी चांगलेच चर्चेत आले आहेत, तसेच त्यांनी विरोधकांसह राज्यातील जनतेचा देखील रोष ओढावून घेतला आहे. यामुळं त्यांची उचलबांगडी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र काल अचानक राज्यपालांनी आपणाला राज्यपालाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली. तशा प्रकारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले. त्यामुळं राज्यपाल खरोखरंच जाणार का? की फक्त ही भाजपाची (BJP) हूल आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. पाहूया तीन महत्त्वाच्या शक्यता…

  भाजपाला राज्यपालांची गरज वाटत नाही?

  सध्या महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाची सत्ता आहे, त्यामुळं भाजपाला जे साध्य करायचे होते, ते त्यांनी केलेले आहे. त्यामुळं आता भाजपाला राज्यपाल कोश्यारी यांची गरज वाटत नाहीय, असे दिसतेय. तसेच राज्यपालांचे वय देखील झाले आहे. दरम्यानच्या काळात राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं भाजपाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नव्हती, मात्र आता जर ते स्वत:हून आदराने जात असतील तर काही हरकत नाहीय, असं भाजपाला वाटत असण्याची शक्यता आहे. त्यामुळं भाजपाला आता राज्यपालांची गरज वाटत नसल्याची शक्यता आहे.

  राज्यपाल पुन्हा चर्चेत राहू पाहतात

  राज्यपालांच्या जबाबदारीतून मला मुक्त करा, यामुळं राज्यपाल पुन्हा एकदा चर्चेत राहू पाहतात का, अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण त्यांना जर राजीनामा द्याचाच होता, तर लोकशाही पद्धतीने किंवा रितसर केंद्रीय गृहमंत्र्यांकडे देणे अपेक्षित आहे. ही संवैधानिक प्रक्रिया आहे. मात्र आता राज्यपालांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याची गरज काय? मागील महिन्यात राज्यपाल कोश्यारींनी अमित शहांना पत्र लिहिले होते. यावेळी त्यांनी आपण महापुरुषाबद्दल कोणतेही वादग्रस्त केले नाही, मी रायगडला जाणारा पहिला राज्यपाल आहे, मी महापुरुषाचा अपमान केला नाही, आपणाला यांच्याबदद्ल आदरच आहे, असं म्हणत त्यावेळी त्यांना गृहमंत्र्यांकडे खुलासा केला होता. पण आता त्यांनी पदभार मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्यानं  राज्यपाल पुन्हा एकदा चर्चेत राहू पाहतात का? किंवा भाजप त्यांना चर्चेत ठेवतंय का? अशी देखील शक्यता आहे.

  वादग्रस्त वक्तव्ये आगामी निवडणुकांमध्ये तापण्याची शक्यता…

  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी २०१९ साली राज्यपालपदाचा पदभार स्विकारला होता. त्यांची मुदत २०१४ पर्यंत आहे. राज्यपालांच्या या कालावधीत त्यांनी सुरुवातील छत्रपती शिवाजी महाराज, जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबद्द्ल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत, यावेळी राज्यातील वातावरण तापलं होतं. तसेच त्यावेळी राज्यपालांच्या विरोधात राज्यपाल हटावसाठी आंदोलने करण्यात आली होती. पण यावेळी भाजपातील पक्षश्रेष्ठींनी किंवा केंद्रीय गृहमंत्र्यांने कोणतेच कारवाई केली नव्हती. मात्र आता जर राज्यपाल आदरयुक्त स्वत: पदभार मुक्त होत असतील तर, त्यांना या जबाबदारीतून मुक्त करावे म्हणजे ‘सुंठेवाचून खोकला गेला…’ असं भाजपाची खेळी असेल. कारण जेव्हा विरोधकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली, तेव्हा भाजपाने कारवाई केली नव्हती. त्यामुळं विरोधकांना याचे श्रेय घेता येणार नाही, असं भाजपाला वाटत असणार. दुसरीकडे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा निवडणुका होणार आहेत, या निवडणुकीत राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा अपप्रचार होऊ शकतो. त्याचा परिणाम मतांवर होऊ शकतो, असं भाजापाला वाटत असण्याची शक्यता आहे, त्यामुळं राज्यपाल स्वइच्छेने जात असतील तर जाऊ द्यावे, असा भाजपाचा कयास असण्याची शक्यता आहे.

  …तर फक्त हूल तर नाही?

  राज्यपाल जाण्यास वरील तीन शक्यता कारणीभूत असू शकतात, मात्र हे खरोखरंच होणार, असं घडणार की, राज्यपालांना मुक्त करण्याची भाजपा फक्त हूल देतंय, हे सुदधा पाहण्याची गरज आहे. जरी राज्यपाल गेले तरी, दुसरे राज्यपाल कोण येणार? यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? याची सुदधा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. राज्यपाल जरी गेले तरी ते आदरयुक्त जातील त्यामुळं त्यांना मुक्त करण्याची भाजपाच्या धुरिणांची रणनीती असू शकते. की फक्त भाजपाची विरोधकांना झूलवत ठेवण्यासाठी खेळ आहे, फक्त हूल आहे हे येणारा काळच ठरवेल.