कल्याण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. प्रतिष्ठेचा मतदार संघ असलेल्या कल्याण लोकसभेसाठी देखील तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणूक कोण लढवणार ही चर्चा सुरु असताना या लोकसभेसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार का ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. महाविकास आघाडी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना घेरण्यासाठी राजकीय चक्रव्यूह रचला जात आहे का हे काही दिवसात समोर येणार आहे.

कल्याण लाेकसभा मतदार संघ खासदार शिंदे यांचा मतदार संघ आहे. २०१४ आणि २०१९ या निवडणूकीत श्रीकांत शिंदे हे भरघोस मतांनी निवडून आले. २०१९ मध्ये तर त्यांच्यासमोर उभा करण्यात आलेला उमेदवार निवडणूकीच्या आधीच्या त्याने तलवार मागे केली होती. मात्र २०२४ मध्ये परिस्थीती वेगळी आहे. शिवसेनेच्या फूटीनंतर राजकीय समिकरणे बदलली आहेत. एकीकडे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्रित आहेत. राहिला प्रश्न कल्याणचा कल्याणमध्ये खासदार शिदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काेणाला उमेदवारी दिली जाईल ही चर्चा सुरु असताना राजकीय वर्तुळात दुसरी चर्चा सुरु झाली आहे. या लोकसभा निवडणूकीसाठी ठाकरे बंधू एकत्रित येणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना फूटीचा वचपा काढण्यासाठी ठाकरे गटाला मजबूत उमेदवार पाहिजे. सध्या त्यांच्याकडे तसा तगडा उमेदवार तूर्तास तरी नाही. मात्र कल्याणमध्ये महाविकास आघाडीकडून मनसेचे आमदार राजू पाटील यांना उमेदवार पाहिले जात आहे. कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. यांच्यादेखील फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनसे आमदार पाटील हे मनसेच्या चिन्हावर निवडणूकीला उभे राहणार महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा देणार अशी देखील चर्चा आहे. खासदार शिंदे यांच्यासमोर निवडणूक ही दुरंगी झाल्यास निवडणूक चुरशीची ठरु शकते. महाविकास आघाडीला विशेष करुन ठाकरे गटाला एका चांगल्या उमेदवाराची गरज आहे. त्यामुळे ही व्यूहरचना खरोखर प्रत्यक्षात येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.