पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट; पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला केले अलर्ट

धरणातील उपलब्ध साठा पाहता आतापासूनच पाणी बचतीचे धाेरण अवलंबा. दैनंदिन पाणी वापर १२५० ते १३०० एमएलडीपर्यंतच करावा, अशी सूचना पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला केली आहे.

    पुणे : खडकवासला धरणातून पुणे महापालिका दररोज १ हजार ५०० एमएलडी पाणी घेत आहे. धरणातील उपलब्ध साठा पाहता आतापासूनच पाणी बचतीचे धाेरण अवलंबा. दैनंदिन पाणी वापर १२५० ते १३०० एमएलडीपर्यंतच करावा, अशी सूचना पाटबंधारे विभागाने पुणे महापालिकेला केली आहे. यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.

    खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर आणि भामा आसखेड या पाच धरणातून पुण्याला पाणीपुरवठा केला जातो. खडकवासला प्रकल्पात २४.१० टीएमसी पाणीसाठा आहे, त्यापैकी ८.५४ टीएमसी पाणी रब्बी हंगामासाठी आरक्षित आहे. हा पाणीसाठा वजा केल्यास धरणामध्ये १५.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. पण, खडकवासला धरणातून पुणे महापालिका दररोज १ हजार ५०० एमएलडी पाणी घेत आहे. त्यामुळे शहरात जूनपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

    पुणे महापालिकेने रोज अडीचशे ते तीनशे एमएलडी पाण्याची बचत करावी. दैनंदिन पाणी वापर १२५० ते १३०० एमएलडीपर्यंत करावा. त्यामुळे जून-जुलैपर्यंत पाणी उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी महापालिकेने डिसेंबरपासूनच पाण्याची बचत करावी, अशी सूचना पुणे महापालिकेला केली आहे.