कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी काम करणार ; माजी विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांचे प्रतिपादन

कामगारांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी मी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते आमदार प्रविण दरेकर यांनी सांगितले.

    लोणावळा : कामगारांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी मी कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे राज्याचे माजी विरोधीपक्ष नेते आमदार प्रविण दरेकर यांनी सांगितले.

    शिवक्रांती कामगार संघटनेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यासाठी दरेकर लोणावळ्यात आले होते. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले, कामगारांच्या न्याय हक्कांसाठी कामगार न्यायालय जलदगती पद्घतीने सुरु करण्यासाठी मी शासनाला भाग पाडणार असून हिवाळी अधिवेशनात कामगारांचे प्रश्न मांडण्याचे आश्वासन दरेकर यांनी दिले. शेतकरी व कामगार हे दोन्ही घटक सशक्य असल्याशिवाय देशाचा गाडा पुढे जाणार नाही. कंत्राटी कामगारांच्या नोकर्‍या सुरक्षित करणे ही गरज आहे. तसेच सेवानिवृत्त कामगारांचा पेन्शनचा प्रश्न देखील शिंदे फडणवीस सरकार मार्गी लावतील असा विश्वास व्यक्त केला.

    यावेळी शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस अॅड. विजयराव पाळेकर, भाजपाचे पुणे जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे, शिक्षण समितीच्या माजी सभापती ब्रिंदा गणात्रा, वरिष्ठ चिटणीस गुलाब मराठे, खजिनदार रविंद्र साठे, सिमा पाळेकर, नरेश खोंडगे, प्रतिक पाळेकर, प्रथमेश पाळेकर, यांच्यासह संघटनेचे संघटक व विविध कंपनी व्यवस्थापनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

    शिवक्रांतीने कामगारांना न्याय देण्याचे काम केले
    शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस विजयराव पाळेकर म्हणाले, अनेक बाजारु कामगार संघटना महाराष्ट्रात आल्या व गेल्या जी २५ वर्ष टिकली ती शिवक्रांती कामगार संघटना आहे. ५० कामागारांना सोबत घेऊन स्थापन झालेल्या या संघटनेचे आता पावणेदोन लाख कामगार सदस्य आहेत. १९९७ सालापासून औद्योगिक वसाहतींमधील गुंडगिरी मोडीत काढून कामगार व कंपन्या यांना न्याय देण्याचे काम संघटनेने केले आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तरच कामगार व शेतकरी यांना न्याय मिळू शकतो असे मत पाळेकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाब मराठे यांनी केले तर सूत्रसंचालन महादेव वाघमारे यांनी केले.